चांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण

चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 31, 2023, 08:46 PM IST
चांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण title=

Chandrayaan-3 Good News:  चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी संशोधन केल्यानंतर  चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीपमोडवर टाकण्यात आले. 22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. अशातच आता चांद्रयान-3 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 घेवून रॉकेट चंद्राकडे झेपावले. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयान लाँच करण्यात आलं. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा गोळा केला.  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क होत नसला तरी  चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल हे चंद्राभोवती घिरट्या घालत आहे.

काय आहे प्रोपल्शन मॉड्यूल हे खास उपकरण?

प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये लँडर मॉड्यूल जोडले गेले होते. प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर विक्रम लँंडरने चंद्रावर सॉफ्ट लँंडिग केले. विक्रम लँडरच्या पोटातून प्रज्ञान रोव्हर बाहरे आला. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहिले.  प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षात घिरट्या घालत आहे. या  प्रोपल्शन मॉड्यूलच्या मदतीने पृथ्वीवरुन येणा-या रेडिएशन्सचा अभ्यास करण्यात येत आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल अजून सक्रिय कसे

स्लीप मोडवर असलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी प्रोपल्शन मॉड्यूल अजून सक्रिय कसे आहे याबाबत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी खुलासा केला आहे.  प्रोपल्शन मॉड्यूल अणुऊर्जेवर  (Nuclear Technology) काम करते. प्रोपल्शन मॉड्यूल मध्ये दोन रेडियोआइसोटोप हीटिंग यूनिट्स (Radioisotopes Heating Units - RHU)  आहेत. 17 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरपासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे झाले. सुरुवातीला प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत 3 ते 6 महिने राहणार असे नियोजन होते. मात्र, आता त्याची कार्यक्षमता पाहता  प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्ष कार्यरत राहू शकते असा दावा अजित कुमार मोहंती यांनी केला आहे.