शिक्षेपासून वाचण्यासाठी शिक्षकाचा जुगाड, तिरडीवर केलं फोटोशूट... असा झाला पर्दाफाश

शिक्षकाने स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचलं, पण तेच त्याला महागात पडलं

Updated: Oct 21, 2022, 10:23 PM IST
शिक्षेपासून वाचण्यासाठी शिक्षकाचा जुगाड, तिरडीवर केलं फोटोशूट... असा झाला पर्दाफाश title=

Trending News : अनेकजण आपल्या वाढदिवसाचं, प्री वेडिंगचं फोटोशूट करतात. पण एका शिक्षकाने चक्क आपल्या निधनाचं फोटोशूट केलं. बिहारच्या भागलपूरमध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे. या शिक्षकावर बलात्काराचा आरोप आहे. शिक्षेपासून वाचण्यासाठी या शिक्षकाने आपल्या निधनाचं नाटकं केलं. इतकंच नाही तर आपला मृत्यू झाला आहे हे पटवण्यासाठी त्याने तिरडीवर झोपून फोटोशूटही केलं. त्या फोटोंच्या आधारे त्याने आपलं मृत्यूपत्रही बनवलं आणि ते कोर्टात जमा केलं.

आरोपी शिक्षक हा इशीपूर बाराहाट इथे रहाणारा आहे. चार वर्षांनी त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 14 ऑक्टोबर 2018 ला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. 

असा रचला मृत्यू बनाव
आपला मृत्यू खराखुरा वाटण्यासाठी त्याने स्वत:ची तिरडीही बांधली. त्यानंतर तो तिरडीवर झोपला, सफेद चार अंगावर ओढून घेतली. याचं त्याने फोटोशूट  केलं. इतकंच काय तर वडिल त्याच्या चितेला अग्नी देतायत असा फोटोही त्याने काढून घेतला. या फोटोंच्या आधारे आरोपी शिक्षकाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचं प्रमाणपत्र बनवून घेतलं. स्मशानभूमीतून लाकडं विकत घेतल्याची चिठ्ठी घेतली. त्यानंतर त्यानंतर सर्व कागदपत्र कोर्टात जमा केली.

कोर्टाने प्रकरण केलं बंद
आरोपी शिक्षकाच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूची सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर न्यायालयाने ती ग्राह्य धरत हे प्रकरण बंद करुन टाकलं. पण पीडित मुलीच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या वडिलांकडे कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर आरोपी शिक्षकाने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.