इंग्रजीत जाब विचारला म्हणून तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण

...याचा पोलिसांना इतका राग आला की त्यांनी या तरुणाला कोणत्याही कारणाशिवाय तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली. 

Updated: Mar 30, 2018, 01:33 PM IST
इंग्रजीत जाब विचारला म्हणून तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण  title=

पाटणा : बिहारच्या खगडिया भागातून पोलिसांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर येतोय. एका विद्यार्थ्यांनं आपल्या मामाला अटक का करण्यात आली? याचा जाब पोलिसांना विचारताना इंग्रजीत संभाषण केलं... याचा पोलिसांना इतका राग आला की त्यांनी या तरुणाला कोणत्याही कारणाशिवाय तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली. 

बाईकचं काम करण्यासाठी गेलेल्या इंदल कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 'आपल्या मामाला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतलं गेलंय' याचा जाब विचारण्यासाठी बारावीत शिकणार अभिषेक पोलीस स्टेशनमध्ये पोहचला होता. यावेळी अभिषेकनं पोलिसांशी इंग्रजीत संभाषण केलं... ही गोष्ट मात्र या पोलिसांना रुचली नाही... आणि त्यांनी अभिषेकलाही ताब्यात घेऊन त्याला मारहाण सुरू केली.  

पीडित विद्यार्थ्याचा आरोप

अभिषेकनं केलेल्या आरोपानुसार, पोलीस अधिकारी मुकेश कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यानं मारहाण करत अभिषेकला बाईक चोरीचा आरोप कबूल करण्यासाठी धमकी दिली. 

तब्बल तीन दिवस मारहाणीमुळे अभिषेक बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीत आणलं जात होतं आणि पुन्हा मारहाण केली जात होती.

...अशी झाली सुटका!

दलालाच्या माध्यमातून ५० हजार रुपये घेऊन तीन दिवसांनंतर पीआर बाँड भरून नातेवाईकांनी विद्यार्थ्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका केली, असा आरोप करण्यात येतोय.

यानंतर कुटुंबीयांनी अभिषेकला खगडियाच्या सदर हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी अभिषेकला जबरदस्त मारहाण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

पोलिसांची दादागिरी उघड 

बारावीत शिकणारा अभिषेक पाटणाच्या सेंट जोसेफ शाळेत शिकतोय. त्याच्यावर बाईक चोरीचा आरोप होता तर त्याला २४ तासानंतर कोर्टासमोर का हजर करण्यात आलं नाही? आणि जर तो आरोपी होता तर केवळ बाँड भरून त्याची सुटका कशी करण्यात आली? असे प्रश्न आता विचारण्यात येत आहेत. या घटनेमुळे बिहार पोलिसांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे.