राज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 6, 2017, 03:57 PM IST
राज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली title=

नवी दिल्ली :  कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.

बहुमताच्या जोरावर विरोधक राज्यसभेत सरकारला बॅकफूटर टाकत असत. नुकत्याच झालेल्या एका विधेयक दुरूस्तीतही हे चित्र दिसले. मात्र, राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक नुकतीच पार पडली आणि निकालनंतर परिस्थिती बदलली. या निकालामुळे भाजप हा संसदेच्या दोन्ही सभागृहातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विद्यमान राज्यसभेत आता भाजपचे 58 सदस्य आहेत तर, विरोधी पक्षाकडे 57. त्यामुळे राज्यसभेत भाजपचे कमळ विस्तारले असून, कग्रेसच्या पंजाची पकड ढिली पडल्याचे चित्र आहे.

मध्यप्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या सम्पतिया उइके यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून गुरूवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. उइके यांची निवड बिनविरोध झाली. 2014 नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारला राज्यसभेत बहुमतात येण्याची पहिलीच संधी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएला राज्यसभेत अद्यापही पूर्ण बहुमत नाही. परंतु, बिहारमध्ये भाजपसोबत नव्याने दोस्ताना सुरू केलेल्या जेडीयूमुळे ही कसर भरून निघू शकते. मात्र, त्यासाठी एनडीएला 2018 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. 2018 मध्ये उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये राज्यसभेसाठी निवडणुका पार पडत आहेत. यावेळी भाजपने आपला कामगिरी कायम ठेवली तरच हे चित्र बदलने शक्य आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या इतर काही रिक्त जागांसाठी मतदान होत आहे. यात गुजरातच्या 3 जागांसाठी जोरदार रस्सीखेच आहे. अर्थात भाजपने सख्याबळानुसार 2 जागा आगोदरच खिशात टाकल्यात जमा आहेत. मात्र, 3री जागा जिंकण्यासाठीही भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे. महत्त्वाचे असे की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे गुजरातमधून राज्यसभेसाठी रिंगणात आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे नाक कापण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डींग लावली आहे. अर्थात या सर्व जागा भाजपने जिंकल्या तरी त्याचा पूर्ण बहुमतासाठी फायदा होणार नाही. पण, सभागृहातील संख्याबळ वाढण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही राज्यसभेच्या रिक्त 6 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र, इथे संख्याबळानुसार ममता बॅनर्जी आपल्या 5 सदस्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवतील. तर उर्वरीत दोन जागांपैकी एका जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. मात्र, एका जागेवर कोण विजयी होणार याबाबत उत्सुकता आहे.

राज्यसभेतील एकुण परिस्थीती विचारात घेता भजपचे कमळ विस्तारत असून, कॉंग्रेसच्या पंजाची पकड ढिली पडत असल्याचे चित्र आहे. हे चित्र कॉंग्रेसच्य राष्ट्रीय राजकारणाला भूषणावह नाही.