PM Narendra Modi : रविवारी भारत मंडपम येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे आम्हाला जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
'भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी देशसेवेसाठी काही ना काही करत राहतात. मात्र आता पुढचे 100 दिवस नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवा उत्साह, नवा विश्वास, नव्या उमेदीने काम करायचे आहेत. आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीए सरकार चारशे पार चे नारे देत आहेत. हे लक्ष्य गाठायाचं असेल तर भाजपाला 370 जागा जिंकाव्याच लागतील. आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी बाहेर पडलो आहोत,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशासाठी एक मोठी हनुमान उडी घ्यायची आहे
'आम्ही देशाला महाघोटाळे आणि दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीतून मुक्त केले आहे, असा संपूर्ण देशाचा विश्वास आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता उपभोगण्यासाठी आम्ही तिसऱ्यांदा सत्ता मागत नाही. पुढील 5 वर्षांत भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करायचे आहे. पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड मोठी हनुमान उडी घ्यायची आहे. आपल्याला जर अशी हनुमान उडी घ्यायची असेल तर सरकारमध्ये भाजप परत येणं आवश्यक आहे हे विसरु नका,असे आवाहन पंतप्रधानांनी केलं.
देशाला विकसित करू शकत नाही हे विरोधकांनी मान्य केलं
"विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या हे माहीत नसेल पण खोटी आश्वासने देण्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. विकसित भारत हे आमचे वचन आहे. आपण भारताला विकसित करू शकत नाही हे या लोकांनी मान्य केले आहे, भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याने हे स्वप्न पाहिले आहे. भारताला तिसऱ्या टर्ममध्ये जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि ही मोदींची गॅरंटी आहे. तरुणांच्या ऊर्जेने भरलेला भारत आज स्वत:साठी ध्येय निश्चित करत आहे आणि जो ध्येय ठेवतो तो ते साध्य करतो. 2029 मध्ये भारतात होणाऱ्या युवा ऑलिम्पिकसाठी आम्ही तयारी करत आहोत, 2036 मध्ये भारत ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी काम करत आहोत," असे नरेंद्र मोदी म्हणाले.
छत्रपती शिवरायांनी आराम केला नाही
"आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. छत्रपती शिवराय हे छत्रपती झाले म्हणून त्यांनी आराम केला नाही. त्यांचं त्यांचं राज्य वाढवलं. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी देखील हेच सांगतो आहे की मी देखील शांत बसणार नाही. राष्ट्राला विकसित राष्ट्र करायचं आहे हा माझा संकल्प आहे. जर मी माझ्या घराची काळजी करत बसलो असतो तर कोट्यवधी लोकांसाठी घरं बांधता आली नसती. त्याचप्रमाणे, मी माझ्या आनंदासाठी आणि वैभवासाठी जगणारी व्यक्ती नाही. मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आणि गौरवासाठी जगणारी व्यक्ती नाही. मी भाजप सरकारची तिसऱ्यांदा सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेली व्यक्ती आहे,' असंही मोदी म्हणाले.