मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. धारावीतील झोपडपट्टीमध्ये पसरणाऱ्या कोरोनाबाबत उद्योजक आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी गृहनिर्माण संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 8 ते 9 लाख लोक 2.5 चौरस किमीमध्ये दाटीवाटीने राहतात, सर्वाधिक लोकसंख्या मुंबईतील धारावीमध्ये पाहायला मिळते. धारावीमध्ये कोरोनाचा संसर्गही सर्वाधिक होऊ शकत असल्याचा धोकाही तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. गृहनिर्माण संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबईत अशा झोपडपट्ट्यांमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्यास शहर बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. शहर बांधकाम व्यावसायिकांना शहरांमध्ये अशाप्रकारच्या झोपडपट्ट्या तयार करण्यास लाज वाटली पाहिजे, असं ते म्हणाले.
परवडणारी घरं आणि झोपडपट्टी निर्मूलनता दोन आश्चर्यकारकपणे परस्पर विरोधी समस्या आहेत. एकीकडे आपण चांगली प्रतिमा दाखवतो तर दुसरीकडे एक अशी प्रतिमा आहे जी लपवली जातेय. बिल्डर आणि आर्किटेक्ट यांनी अशा झोपटपट्टी तयार केल्या आहेत जिथे शुद्ध-मोकळी हवा, स्वच्छता या सगळ्याचाच अभाव आहे.
झोपडपट्ट्यांना आपण 20-30 मैलांच्या अंतरावर असलेल्या इतर ठिकाणी, शहरापासून लांब असलेल्या, नोकरीच्या संधी नसलेल्या ठिकणी त्यांचं स्थलांतर करतो. त्यानंतर झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी उच्च-मूल्यांच्या गृहनिर्माण संस्था तयार करतो. झोपडपट्ट्यांना अशाप्रकारे विकासाचे अवशेष बनवत असल्याची टीका रतन टाटा यांनी केली.
ज्या भागात झोपडपट्टी उभी होती त्या भागात विकासकांना मोठा फायदा हा उच्च-मूल्याच्या गृहनिर्माण क्षेत्राद्वारे होतो. कोरोना व्हायरसबाबत होणाऱ्या गोष्टी पहिल्यांदाच होत आहे. बांधकाम व्यवसायिकांनी बांधलेल्या, अगदी जवळ-जवळ बांधलेल्या कमी मूल्यांच्या संरचना कोरोना व्हायरस पसरण्याचं सर्वात मोठं कारण ठरत असल्याचं, ते म्हणाले.