BOB Home Loan Interest Rate: होमलोन व्याजदर कमी करण्याच्या बँक यादीत आणखी एका बँकेची भर पडली आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) शुक्रवारी गृहकर्ज (Home Loan) व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करुन 8.25 टक्के केले. यासोबतच अर्ज निकाली काढण्यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्कही मर्यादित कालावधीसाठी माफ करण्यात आले आहे. BoB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
BOBचे महाव्यवस्थापक एचटी सोळंकी, म्हणाले, आमच्या गृहकर्जाचे दर आता व्यवसायातील सर्वात कमी आणि सर्वात स्पर्धात्मक दरांपैकी आहेत. आम्ही व्याजदरात 0.25 टक्के सूट देत आहोत तसेच प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करत आहोत. ज्यांना शिल्लकी हस्तांतरण ( balance transfer) करायचे आहे त्यांच्यासाठी देखील नवीन दर लागू होतील आणि विशिष्ट दर कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलशी जोडलेला आहे. यावर्षी आम्ही शहरांमधील मागणी आणि घरांची विक्री वाढ होण्यासाठी गृहकर्जांमध्ये सूट दिली आहे. या सवलतीच्या दराने आधीच वाढलेली मागणी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे, असे ते पुढे म्हणाले. गेल्या महिन्यात, वाढलेले व्याजदर असूनही, SBI आणि HDFC ने त्यांच्या सणाच्या ऑफरचा भाग म्हणून व्याजदरात 8.40 टक्क्यांपासून सूट देण्याची घोषणा केली.
SBI नवीन गृहकर्ज घेणार्यांना 25 आधार अंकांपर्यंत सवलतीच्या व्याजदराची ऑफर देत आहे, एंट्री लेव्हल रेट 8.40 टक्क्यांपर्यंत नेत आहे आणि ही ऑफर जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. दुसरीकडे, HDFC ने नवीन दर 20 bps ने कमी करून 8.40 टक्के व्याज देऊ केले आहे आणि ही ऑफर नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आहे.
दुसरीकडे, बँक ऑफ इंडियाकडून स्टार होम लोन दरवर्षी 8.30 टक्के दराने मिळू शकते. त्याची सर्वात स्वस्त EMI 7.755 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहक इतर बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये सुरु असलेली त्यांची गृहकर्जे बँक ऑफ इंडियामध्ये हस्तांतरित करू शकतात. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्ज अर्जदाराला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल, तर लोक कमी व्याजदराचे वचन, सुलभ तरलता आणि कर सूट या तीन फायद्यांचा लाभ घेऊ शकतात.