Stamp Duty : तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर 31 मार्चपूर्वी खरेदी करा. अन्यथा त्यानंतर घर खरेदी किंवा जमीन खरेदी करणे महागात पडणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात स्टॅम्प ड्युटी 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता असून ती एक टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे आता खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. तसेच रेरा अंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने आधीच आणला आहे. त्यात आता स्टॅम्प ड्युटीत वाढीचे संकेत, यामुळे घरे घेणे अधिक महागणार आहेत.
तुम्ही जर घर खरेदी तसेच जमीन खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून स्टॅम्प ड्युटी 1 टक्क्यानं वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या घर आणि जमीन खरेदीवर 7 टक्के स्टॅम्प ड्युटी आहे. ही स्टॅम्प ड्युटी आता 8 टक्के होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेरा अंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने आणला आहे. हा विमा काढणं जमीन मालक आणि विकासकांना सक्तीचे असणार आहे. त्यामुळं घरांच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. ज्या जमिनीवर बांधकाम होणार, त्या जमिनीचा विमा म्हणजे टायटल इन्शुरन्स गरजेचे आहे. परदेशात टायटल इन्शुरन्स आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठीच देशातही असा इन्शुरन्स आणण्याचा प्रस्ताव आहे. असे असले तरी मात्र याचा भार सामान्य ग्राहकांवर पडेल. त्यामुळे घर खरेदी करणे महाग होण्याची शक्यता आहे.
टायटल इन्शुरन्सची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल. टायटल इन्शुरन्स केलं तर प्रती चौरस फूट 150 ते 200 रुपयांनी भाव वाढतील. यासाठी बिल्डरला इमारत विकास प्रकल्पातली अंदाजे दोन ते तीन टक्के रक्कम मोजावी लागेल. फ्लॅट खरेदीत गुंतवलेले पैसे बुडतील ही भीती परदेशी ग्राहकांना वाटते. ती भीती दूर करण्यासाठी टायटल इन्शुरन्स सक्तीचा होणार आहे. मात्र याचे पैसे ग्राहकांच्या खिशातूनच बांधकाम व्यावसायिक काढतील. त्यामुळे घरे महाग होणार याचे संकेत मिळत आहेत.