'वन नेशन, वन रेशनकार्ड'शी जोडली गेली चार राज्य

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती

Updated: Aug 1, 2020, 05:43 PM IST
'वन नेशन, वन रेशनकार्ड'शी जोडली गेली चार राज्य title=

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत २४ राज्यांमध्ये एक देश- एक रेशन कार्ड (One Nation One Ration card) ही योजना लागू करण्यात आली आहे. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत रेशन कार्डधारक देशात कोठेही कार्डचा वापर करू शकतो. .या व्यवस्थेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशनकार्ड धारक देशातील या २४ राज्यांतील कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य माफक दरात विकत घेऊ शकतील.

रामविलास पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये वन नेशन, वन रेशन कार्ड ही योजना राबवण्यात येणार आहे. आता या रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा २४ राज्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.' अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. 

आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, दीव आणि दमन या १७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत 'वन नेशन वन रेशनकार्ड' ही योजना लागू करण्यात आली होती.

त्यानंतर १ जूनपासून यात ओडिशा, मिझोरम आणि नागालँड या राज्यांचाही समावेश करण्यात आला. आता १ ऑगस्टपासून उत्तराखंड, नागालँड आणि मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यांमधील नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.