मुंबई : स्पर्धेच्या काळात टेक्नोलोजीची झपाट्याने प्रगती होत आहे. पण याचे काही चांगले आणि वाईट परिणाम देखील आहेत. एक अज्ञात मुलगी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर लोकांचे अश्लील व्हिडीओ तयार करुन पैशांची मागणी करते. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना छतरपूर आणि दौसा राजस्थानमधून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून अटक करण्यात आली आहे.
दोघांनी वकिलाकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी दोघेही गेल्या नऊ महिन्यांपासून फरार होते. त्याच्या अटकेवर दिल्ली पोलिसांनी 20-20 हजारांचे बक्षीस ठेवले होते.
अर्शद खान मुलगा अली खान (30 वर्षे) आणि मुंडी खान (39 वर्षे) अशी दोन अटक करण्यात आलेल्यांची ओळख आहे. आरोपींकडून 3 जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. स्पेशल सेलचे डीसीपी जसमीत सिंग यांनी सांगितले की, या टोळीतील लोक मुलींच्या नावाने लोकांना मेसेज करायचे.
ही टोळी लोकांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळत होती. एसीपी अत्तार सिंग आणि ईश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 21 जुलै रोजी संध्याकाळी अर्शद खानला फ्लॉवर मार्केट छतरपूर येथून अटक केली होती.
मुश्ताक खानला 23 जुलै रोजी त्याच्या गावातून अटक करण्यात आली. बाराखंबा रोड परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि गुन्हेगारी धमकावण्याच्या गुन्ह्यात दोघेही फरार होते.
चौकशीदरम्यान, दोघे मेवातचा कुख्यात गुंड सद्दाम हुसेनशी संबंधित असल्याचे उघड झाले. सद्दामने त्याच्या साथीदारांसह दिल्लीतील वकिलाकडे खंडणीची मागणी केली होती आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.
आरोपी अर्शद खानने सांगितले की, टोळीतील लोक गरीब लोकांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून पैसे उकळायचे. सध्या अशा गुन्ह्यांची प्रकरणे वाढत असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा.