नवी दिल्ली : देशभरातील टोलनाक्यांवर वेगवेगळ्या कारणांनी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. यामुळे प्रवासी चांगलेच वैतागलेले असतात. मात्र, आता प्रवाशांची या त्रासातून सुटका होणार आहे. कारण येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरातील टोकनाके कॅशलेस करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे येत्या एक सप्टेंबरपासून ‘ई-टोल’ आकारण्यात येणार आहे.
कॅशलेस व्यवहारासाठी ‘फास्टटॅग’ हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची (एनपीसीआय) मदत घेण्यात येणार आहे. त्यानुसार ‘फास्टटॅग’च्या ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न आणि टोल नाक्यानजीक कॉमन सर्व्हिस सेंटरची (सीएससी) उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे सुट्या पैशांची अडचणी दूर होणार आहे.
नेहमी प्रवास करणा-यांसाठी फास्टटॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाइटवर आणि सरकारी बँकांच्या वेबसाइटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असेल. फास्टटॅगची खरेदी केल्यानंतर ते कुरियरद्वारे घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑनलाइन विक्रीशिवाय शुक्रवार १८ ऑगस्टपासून फास्टटॅग सर्व टोलनाक्यांनजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘फास्टटॅग’ हे स्टीकर असून, वाहनाच्या काचेवर चिटकविण्यात येणार आहे. ‘फास्टटॅग’ रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामध्ये वाहनाविषयीची सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठविण्यात येते. त्यामुळे ‘फास्टटॅग’चे स्टीकर असणारे वाहन टोलनाक्याजवळून जाताच टोल आपोआप कापून घेण्यात येईल. आतापर्यंत सहा लाख फास्टटॅगची विक्री करण्यात आली आहे. फास्टटॅग सेवा ग्राहकांना सुलभरीत्या वापरता यावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन अॅप्लिकेशन (अॅप) गुरुवारी बाजारात आणली. मायफास्टटॅग व फास्टटॅग पार्टनर अशी या अॅपची नावे आहेत. यामुळे टोलचे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सोपे जाणार आहे.