CBSE Class Result 2019: सीबीएसईच्या निकालात मुलींची बाजी

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे.

Updated: May 6, 2019, 04:25 PM IST
CBSE Class Result 2019: सीबीएसईच्या निकालात मुलींची बाजी title=

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये एकूण ९१.१ टक्के विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या आहेत. त्रिवेंद्रममधून सर्वाधिक ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर चेन्नई ( ९९ टक्के) दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावरील अजमेरमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी ९५.८९ टक्के इतकी आहे. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. 

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९९ टक्के लागला. निकालात मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण २.३१ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून संयुक्तरित्या अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेला देशभरात १८ लाख विद्यार्थी बसले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे.