नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील वादावर आता तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश यांच्यातील वाद मीडियासमोर उघड केला. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कारभारासंबंधी उघड नाराजी काल मीडियासमोर व्यक्त करण्यात आली. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यानंतर आज हा वाद मिटविण्यासाठी हालचाली झाल्या असून एक समितीही स्थापन करण्यात आलेय.
न्यायाधीशांच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी बार काउन्सिलने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वादात समेट घडवण्याचे काम ही समिती करणार आहे.
'बार काउन्सिलची सात सदस्यीय समिती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेणार आहे. हा वाद लवकरात लवकर मिटावाअसे आम्हाला वाटते, असे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले. 'न्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहायला हवी. नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
न्यायाधीश जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. सरन्यायाधीश महत्वाची प्रकरणं वरिष्ठ न्यायाधीशांना वगळून कनिष्ठ न्यायाधीशांकडे वर्ग करतात, असा या न्यायाधीशांचा आरोप आहे.