नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल आणि ५ वाजता हा कार्यक्रम संपेल. ५ वाजता हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेईल. ही चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणात ही चाचणी होणार आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
संविधान दिनाच्या दिवशी आलेल्या या निर्णयामुळे तिन्ही पक्ष समाधानी आहोत, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. महाविकासआघाडीने काल १६२ आमदारांचं संख्याबळ दाखवलं. उद्याच्या बहुमत चाचणीवेळीही हेच दिसून येईल. उद्या हे सगळं होण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी आजच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.