Congress : पराभवानंतर 4 तास चालली बैठक, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत झाला हा निर्णय़

CWC Meeting : 5 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षाची चर्चा होती. पण तसा काही निर्णय झाला नाही.

Updated: Mar 13, 2022, 10:01 PM IST
Congress : पराभवानंतर 4 तास चालली बैठक, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत झाला हा निर्णय़ title=

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी (CWC) ची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था सीडब्ल्यूसीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. सोनिया गांधींशिवाय, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. (Congress CWC meeting in New delhi)

सोनिया गांधी यापुढेही काँग्रेसचे नेतृत्व करणार

पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या पुढेही आमचे नेतृत्व करतील. भविष्यात त्यांच्या निर्णयांनीच पक्ष पुढे जाईल. आपल्या सर्वांचा त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्या (Sonia Gandhi) पक्षाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. 

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, 5 राज्यांच्या निवडणुका, गोष्टी कशा पुढे न्याव्यात आणि आगामी निवडणुकीची तयारी कशी करावी याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली.

या बैठकीवा गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांनीही सहभाग घेतला. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित नव्हते. कोविड 19 ची लागण झाल्यामुळे ज्येष्ठ नेते ए के अँटनी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. महत्त्वपूर्ण बैठकीच्या एक दिवस आधी, मीडियाच्या एका भागाने असे वृत्त दिले होते की गांधी कुटुंबीय पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊ शकतात, पण काँग्रेसने अधिकृतपणे या वृत्ताचे खंडन केले.

बैठकीपूर्वी गेहलोत, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतर अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत म्हणाले की, आजच्या काळात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूर्ण ताकदीने लढत आहेत. 

शिवकुमार यांनी ट्विट केले की, 'मी आधी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींनी पूर्णवेळ अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासारख्या पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

CWC बैठकीदरम्यान, पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष मुख्यालयाजवळ जमले आणि त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि त्यांना पुन्हा एकदा पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी केली. ही महत्त्वपूर्ण बैठक अशा वेळी आली आहे जेव्हा काँग्रेसने पंजाबमध्ये सत्ता गमावली आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. सोनिया गांधी काही काळापासून सक्रियपणे प्रचार करत नाहीत, प्रियंका गांधी वाड्रा यांच्याशिवाय राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. तसेच, पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भाऊ-बहीण जोडीचा मोठा वाटा असतो.