काँग्रेस - राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पुढाकार घेतला आहे. पण...

Updated: Nov 19, 2019, 02:56 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी संयुक्त बैठकीवर भर देण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीतली आजची बैठक रद्द झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे काम असल्याने आजची बैठक रद्द  झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते बैठकीसाठी आले होते. परंतु आजची बैठक काही कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असल्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. ही बैठक उद्या होणार असल्याचे मलिकांनी सांगितले. तर दुसरीकडे उद्याच्या बैठकीचा अजून निरोपच आला नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी केला आहे. 

आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत दाखल झालेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार, नवाब मलिक, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी.पाडवी यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी गुगली टाकली होती. आमची महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, आता दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बैठक होत असल्याने पुन्हा सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल निर्णय घेण्यासाठी पुढील एक ते दोन दिवसात आमचे सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी शिवसेनबरोबर सरकारस्थापनेसंदर्भात काहीच सांगितले नव्हते. आता या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मात्र, आजची बैठक रद्द झाली असून उद्या ही बैठक होऊ शकते, अशी माहिती देण्यात आलेली आहे.