Hathras Case : पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक

उत्तर प्रदेश पोलिसांनी केली कारवाई   

Updated: Oct 1, 2020, 06:02 PM IST
Hathras Case : पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस Hathras Case  या खेड्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिचा अमानुष छळ करण्यात आला. मृत्यूशी सुरु असणरी त्या तरुणीची झुंज अखेर अपयशी ठरली आणि तिनं या जगाचा निरोप घेतला. हाथरसमधील या घटनेनं साऱ्या देशात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. सदर प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारही निशाण्यावर आलं आहे. दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर हाथरसमधील परिस्थितत तणावाची भर पडली असून, सदर भागात कलम १४४ लागू करण्यात आल्याचं कळत आहे. 

हाथरस मुद्द्यावरुन राजकारणातही बरीच वादळं येत असताना काँग्रेस नेते rahul gandhi राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा priyanka gandhi vadra यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्या रोखानं त्यांनी प्रवासही सुरु केला. पण, त्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई करत राहुल आणि प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर तीन- चार तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. सोबतच सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी उट्टर प्रदेशात येऊ नये अशी अटही घालण्यात आल्याचं कळत आहे. 

पोलिसांची एक गाडी या दोघांनाही घेऊन घटनास्थळाहून रवाना झाली. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर लाठीचार्जही करण्यात आला. राहुल गांधी यांनी कलम १४४ चं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

 

ज्याबाबत काँग्रेस नेते आणि काँग्रेस समर्थकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पायी निघालं असतानाच राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवलं, ज्यावेळी आपल्याला पोलिसांनी खाली पाडल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं. फक्त मोदीच या देशात पायी चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का? वाहन थांबवल्यामुळंट आम्ही पायी निघालो होतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.