काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात 'राहुल गांधी मुर्दाबाद'च्या घोषणा

भाजपने हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Updated: Sep 10, 2018, 08:02 PM IST
काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात 'राहुल गांधी मुर्दाबाद'च्या घोषणा

मुंबई: इंधन दरवाढीवरून सोमवारी मोदी सरकारचा निषेध करायला रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे पक्षाचे चांगलेच हसे झाले. अशा प्रसंगांचा एक व्हीडिओ भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. 

यामध्ये भारत बंद आंदोलनादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणा देताना दिसत आहेत. मात्र, घोषणा देण्याच्या भरात काही काँग्रेस कार्यकर्त्यांचे भान हरपले. हे कार्यकर्ते चक्क 'नरेंद्र मोदी जिंदाबाद'; 'राहुल गांधी मुर्दाबाद', असे बोलून गेले. नेमकी हीच गोष्ट हेरून भाजपने हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओला तासाभरात दहा हजारहून अधिक लाईक्स आणि हजारो रिट्विटस मिळाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या आजच्या भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आंदोलनाचा अधिक प्रभाव जाणवला. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले.