भारतात कोरोना व्हायरसचे एवढे प्रकार, आयसीएमआरकडून लस शोधण्यासाठीचा अभ्यास सुरू

कोरोना व्हायरसबाबत आयसीएमआरची महत्त्वाची माहिती

Updated: May 3, 2020, 03:29 PM IST
भारतात कोरोना व्हायरसचे एवढे प्रकार, आयसीएमआरकडून लस शोधण्यासाठीचा अभ्यास सुरू title=

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरसचे तीन प्रकार असल्याचं समोर आलं आहे. यातला एक व्हायरस वुहानमधून तर बाकीचे व्हायरस इटली आणि इराणमधून आलेले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) कोरोना व्हायरसचा प्रसार होताना मागच्या २ महिन्यात त्यामध्ये म्युटेशन झालं का याचा अभ्यास करणार आहे. म्युटेशन म्हणजे कोणत्याही पेशीमध्ये अनुवंशिक परिवर्तन. आयसीएमआरच्या ज्येष्ठ संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार म्युटेशन झालं असेल, तर संभाव्य लस प्रभावी करणं सोपं होईल.

म्युटेशनचा अभ्यास केल्यानंतर व्हायरस जीवघेणा झाला आहे का? आणि याच्या संक्रमण पसरवण्याची क्षमता वाढली आहे का? हे कळेल. सगळ्या रुग्णांचे नमुने मिळाल्यानंतर कोरोना व्हायरसमध्ये अनुवंशिक परिवर्तन झालं का ते अभ्यासातून समजेल, असं आयसीएमआरचे संशोधक म्हणाले.

लॉकडाऊन संपल्यानंतरच या संशोधनाला सुरूवात होईल, कारण वेगवेगळ्या राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशातून नमुने एकत्र करण्यात अडचण येत आहे, असंही संशोधकांकडून सांगण्यात आलं. इतर देशांच्या तुलनेत भारतातल्या कोरोना व्हायरसमध्ये ०.२ ते ०.९ टक्के अंतर असल्याचं जीआईएसएआईडीच्या आकडेवारीवरून दिसत असल्याचं, आयसीएमआरच्या दुसऱ्या शास्त्रत्रांनी सांगितलं.

जीआईएसएआईडी जगातल्या सगळ्या इंफ्लुएन्जा व्हायरस आणि संसर्गजन्य रोगाची आकडेवारी जाहीर करतं. जगभरातले कोरोनाचे ७ हजार नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये ठेवण्यात आले आहेत. या नमुन्यांचं व्हायरसच्या म्युटेशनच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलं आहे. या वर्गीकरणानुसार आत्तापर्यंत भारतात तीन प्रकारचा कोरोना व्हायरस असल्याचं समोर आलं आहे. यातला एक वुहान तर इतर इटली आणि इराणचे आहेत.

म्युटेशनमुळे लस निष्प्रभ होण्याची शक्यता नाही, कारण व्हायरसच्या सगळ्या प्रकारांमध्ये एकसारखच एंजाईम आहे, तसंच यामध्ये जलद बदलाव होत नाहीयेत, असं आयसीएमआरचे प्रमुख डॉक्टर गंगाखेडकर यांनी सांगितलं. भारतात सध्या कोरोनावर लस तयार करण्याचं काम ६ कंपन्या करत आहेत.