राजधानीला पुन्हा कोरोनाचा विळखा; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.     

Updated: Nov 19, 2020, 07:57 AM IST
राजधानीला पुन्हा कोरोनाचा विळखा; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हात बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या महत्त्वाच्या बैठकीत भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

कोरोना व्हायरस या विषाणूमुळे राजधानी दिल्लीला मोठा फटका बसत आहे. त्यासाठी सर्व पक्षांची बैठक आज सकाळी ११ वाजता दिल्ली सचिवालयात होणार आहे. कोरोनाच्या विळख्यातून राजधानीला कसं बाहेर काढता येईल याविषयावर बैठकीत चर्चा होणार असून १०० खासगी रुग्णालयांवर रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्राने १० टीम तयार केल्या आहेत. 

दरम्यान दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. बुधवारी दिल्लीत १३१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. याआधी १२ नोव्हेंबर रोजी १०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या १० दिवसात कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण १.४८ टक्के राहिले आहे.