Corona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक

'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला...   

Updated: Jun 25, 2020, 06:46 AM IST
Corona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जगभरातील असंख्यजणांना संक्रमित करुन साऱ्या जगापुढे एक संकट उभं करणाऱ्या Coronavirus कोरोना व्हायरसचा सर्वाधिक कहर आता भारतातही दिसू लागला आहे. बुधवारी या व्हायरसची बाधा होणाऱ्या रुग्णांच्या आकड्या उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या एका दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल १५४१३ नं भर पडली. हा आकडा सहाजिकच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची चिंता आणखी वाढवून गेला. 

कोरोनाचं हे संकट देशातील विविध राज्यांमध्ये विविध स्वरुपात विस्तारत आहे. याचेच परिणाम आता राज्य प्रशासनांच्या निर्णयांवरही दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार होतानाही टप्प्याटप्प्यानं अनलॉची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र सावधगिरी म्हणून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. आता या ठिकाणी लागू असणारा लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

राज्याराज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक वळणावर असतानाच दिल्लीतही असंच काहीसं चित्र दिसत आहे. बुधवारी दिल्लीमध्ये तब्बल ३७८८ नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. ज्यामुळं येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७०००० हजारांवर पोहोचला. 

 

कोरोनामुळं प्राण गमावणाऱ्यांची संख्या या ठिकाणी २३६५ वर पोहोचली आहे. हा एकंदर आकडा पाहता कोरोनाच्या बाबतीत दिल्लीनं मुंबईलाही मागे टाकलं असल्याचं कळत आहे. त्यामुळं आता देशात सर्वाधिक कोरोनाबाधित दिल्लीत असल्याचं चित्र आहे. येत्या काळात झपाट्यानं वाढणाऱ्या या कोरोनाच्या संक्रमणावर ताबा मिळवण्यासाठी आता प्रशासन आणि आरोग्य खात्याकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातात आणि त्यांचा कुठवर फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.