कोरोनाचे साडेसोळा हजार बळी, जगभरात पावणेचार लाख रुग्ण

या देशांत २४ तासांत सर्वाधिक मृत्यू

Updated: Mar 24, 2020, 11:23 AM IST
कोरोनाचे साडेसोळा हजार बळी, जगभरात पावणेचार लाख रुग्ण title=

मुंबई : जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणे चार लाखांच्या वर गेला असून मृतांचा आकडाही साडेसोळा हजाराच्या जवळ पोहचला आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा वाढतच असून एका दिवसात ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. अमेरिकेतही मृतांचा आकडा ५५० च्या जवळ पोहचला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात फारच वेगानं होत आहे. युरोप आणि अमेरिकेत रोज शेकडो मृत्यू होत आहेत. इटलीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून २४ तासांत आणखी ६०१ बळी गेले. इटलीत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजाराच्या घरात पोहचली असून मृतांचा आकडा ६०७७ इतका झाला आहे.

इटलीनंतर स्पेनमध्ये मृतांचा आकडा झपाट्यानं वाढतोय. दिवसभरात स्पेनमध्ये ५३९ मृत्यू झालेत. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३५,१३६ इतकी झालीय. स्पेनमध्ये मृतांची संख्या २३११ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे इटलीमध्ये आठवडाभरापूर्वी अशीच स्थिती होती. त्यामुळे परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी स्पेनला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे.

महासत्ता अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी शंभरावर अधिक बळी गेले. काल दिवसभरात अमेरिकेत १३२ जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या ५४५ वर पोहचली. अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असून आतापर्यंत ४३ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

इराणमध्येही दिवसभरात १२७ जणांचा बळी गेला. इराणमध्ये २३ हजार ४९ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मृतांचा आकडा १८१२ पर्यंत पोहचला आहे. फ्रान्समध्येही काल १८६ रुग्णांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या ८६० इतकी झालीय. तर कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ८५६ इतकी झालीय.

ब्रिटनमध्येही ३०० हून अधिक बळी कोरोनामुळे गेले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६६५० इतकी झाली असून काल दिवसभरात ५४ जणांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये ३३५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याचं आकडेवारी सांगते. १९० पेक्षा अधिक देशांत कोरोनाचे रुग्ण असून कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ७८ हजार ५६० इतकी झालीय. तर जगभरात १६ हजार ४९५ जणांचा बळी गेला आहे.