Coronavirus : 'लॉकडाऊन'च्या काळात गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले 'देवदूत'

पोलिसांच होतंय कौतुक 

Updated: Mar 27, 2020, 02:45 PM IST
Coronavirus : 'लॉकडाऊन'च्या काळात गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले 'देवदूत' title=

मुंबई : कोरोनाची दहशत बघता संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अजून १८ दिवस म्हणजे पुढील १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. याकाळात सामान्यांना काही संकटांना सामोरं जावं लागत आहे. पण अशावेळी त्यांच्यासाठी देवदूत बनून येत आहेत आपले पोलीस. 

ही गोष्ट आहे तमन्ना आणि तिचा पती अनीस खानची. लॉकडाऊनमुळे गेल्या १० दिवसांपासून अनीस खान नॉएडात अडकले आहेत. तमन्ना गरोदर असून याकाळात ती एकटी घरी होती. लॉकडाऊनमुळे दोघं ही आहेत त्या ठिकाणी अडकून राहिले होते. अशावेळी तमन्नाने आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून समस्या सांगितल्या. 

हा व्हिडिओ बरेलीच्या एसपीपर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ नॉएडातील एडीसीपी कुमार रणविजय सिंह यांच्याशी संपर्क साधून मदतीची आवाहन केलं. यावेळी रणविजय मेडिकलमध्ये स्वतःसाठी काही औषध घेत होते. त्यांनी लगेचच अनीसशी संपर्क साधून त्याला घरी नेण्याचा बंदोबस्त केला. 

बुधवारी रात्री ११ वाजता तमन्नाला कळा सुरू झाल्या. यावेळी शेजारच्या मंडळींनी तिला रूग्णालयात दाखल केलं. त्याचरात्री अडीच वाजता रणविजय अनीसला घेऊन बरेलीला पोहोचले. तेव्हा तमन्ना रूग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ४५ मिनिटांनी अनीस बाबा झाल्याचं कळलं. तमन्ना आणि अनीसला आपण एकमेकांना कधी भेटू याबाबत शाशंक असताना पोलीस कुमार रणविजय यांच्यामुळे भेट झाल्यामुळे ते आनंदी आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं नाव रणविजय खान असं ठेवलं आहे.