भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला; २४ तासांत १ हजारहून अधिक रुग्ण बरे

देशात 11 हजार 707 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

Updated: May 4, 2020, 05:53 PM IST
भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला; २४ तासांत १ हजारहून अधिक रुग्ण बरे title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजारांवर गेला आहे. देशात एकूण 42 हजार 533 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 2500 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 29 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

गेल्या 24 तासांत देशात 1 हजार 74 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंतचा रुग्ण बरे होण्याचा हा सर्वाधिक आकडा आहे. आतापर्यंत देशात 11 हजार 707 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत असताना एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून तो 27.52 टक्के इतका झाला असल्याची, माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना संसर्गाबाबत टेस्टिंग क्षमता सतत वाढत आहे. आज देशात एकूण 426 लॅब कोरोना संसर्गाचे सॅम्पल टेस्ट करत आहेत. यापैकी 315 सरकारी क्षेत्र तर 111 खासगी क्षेत्रातील लॅब आहेत.

'लॉकडाऊनआधी रुग्ण वाढीचा डबलिंग रेट 3.4 इतका होता. मात्र आज तो वाढून 12 इतका झाला आहे. डबलिंग रेट अजून वाढवायचा आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण सतत वाढत आहेत, त्या भागातील कंटेन्मेंट झोनवर लक्षकेंद्रीत करण्यात येत असल्याचं' अग्रवाल यांनी सांगितलं.

देशात 4 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील 3.0 लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. या लॉकडाऊनदरम्यान ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये असलेल्या भागांना त्या-त्या झोननुसार अटी-शर्तींसह काही दुकानं सुरु करण्यास सूट देण्यात आली आहे. 

मात्र दुकानं सुरु झाल्यानंतर किंवा इतर क्षेत्रातील काम सुरु झालं असल्यास संबंधितांना सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनाचं, अटी-शर्तींचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. या सूट दरम्यान नियमांचं पालन न झाल्यास किंवा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास किंवा कोरोना रुग्ण आढळल्यास तिथे पुन्हा निर्बंध घातले जाऊ शकत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.