Coronavirus in India: देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यावेळी कोरोनाने लहान मुलांना बाधित केले आहे. मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीजवळील एका मोठ्या शहरातील शाळेच्या वसतिगृहात 17 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
देशात गेल्या 24 तासांत देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन जण दिल्लीतील आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना संसर्गाचा दर 26 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच, चाचणी केलेल्या प्रत्येक 100 लोकांपैकी 26 जणांना कोरोना झाला आहे. उत्तर प्रदेशबाबत सांगायचे झाले तर गौतम बुद्ध नगर जिल्ह्याची स्थिती सर्वात वाईट आहे. तेथे कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे आरोग्याविभागाने आवश्यक तयारी सुरु केली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 5676 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये केरळमधील 6 आणि दिल्लीतील 3 रुग्णांचा समावेश आहे. यासह, देशातील कोरोना साथीच्या सक्रिय रुग्णांची संख्या 37 हजारांच्या पुढे गेली आहे.
दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुद्ध नगरमध्येही कोरोनाचा स्फोट झाला आहे. जिल्ह्यातील सूरजपूर शहरात गेल्या आठवडाभरात सुमारे 35 जण कोरोनाच्या विळख्यात आहेत. दुसरीकडे, मंगळवारी कस्तुरबा गांधी निवासी वसतिगृहात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत 17 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. प्रत्यक्षात वसतिगृहातील 10 मुलांना खोकला आणि सर्दीचा त्रास होता, त्यासाठी शाळेने त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, 10 पैकी 8 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलीत.
वसतिगृहातील 17 मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या टीमने सर्व मुलांची तपासणी केली. सर्व मुलांना वसतिगृहातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तेथे वसतिगृह व्यवस्थापन त्यांची काळजी घेत आहे. सर्व मुलांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. वसतिगृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुलांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचवेळी जिल्हा व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग पूर्ण अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात अनेक राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील विजापूरमध्येही कोरोनाने दार ठोठावले आहे. तसेच 18 बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बालक आश्रम हिंगुम आणि बालक आश्रम छोटेपल्ली येथे सर्व मुलांना संसर्ग झाल्याचे आढळले. मुलांची कोरोना चाचणी केली असता त्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले.