Crocodile Chasing Deer Video: नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; थरार कॅमेरात कैद

Crocodile Chasing Deer In The River Video: व्हायरल व्हिडीओमध्ये एक मगर नदीमध्ये एका हरणाचा पाठलाग करताना दिसत आहे. हरीण नदी ओलांडत असतानाच हा सारा प्रकार घडला असून तो कॅमेरात कैद झाला आहे.

Updated: Feb 7, 2023, 07:20 PM IST
Crocodile Chasing Deer Video: नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; थरार कॅमेरात कैद
Crocodile Chasing Deer Video

Crocodile Chasing Deer In The River Video: चित्रपट निर्माते विनोद कापरी (Filmmaker Vinod Kapri) यांनी सोमवारी ट्विटरवरुन (Twitter) एक गोंधळात टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक मगर (crocodile) नदीमध्ये हरणाचा (antelope) पाठलाग करताना दिसत आहे. हरीण नदी ओलांडत असतानाच त्याच्यावर मगरीने हल्ला केल्याचा थरार याच नदीमधून जात असणाऱ्या एका बोटीमधून पर्यटकांनी कॅमेरात कैद केला आहे. निर्देशक कपारी यांनी व्हिडीओचा शेवट थक्क करणारा असल्याचं म्हटलं आहे.

केवळ हरणाचं डोकं दिसतं

व्हायरल झालेला हा व्हिडीओ (Viral Video) मूळचा 'विझडम ऑफ द लायन' नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 50 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक हरीण नदी ओलांडताना दिसत आहे. नदीपत्रामध्ये केवळ हरणाचं डोकं दिसत असून ते पोहत असतानाच एक मगर त्याचा पाठलाग सुरु करते. मगर आणि हरणामधील अंतर हळूहळू कमी होतं जाताना व्हिडीओ स्पष्टपणे दिसून येतं.

मगरीने वेग वाढवला...

मगरीला शिकार दिसल्यानंतर तिने आपला वेग वाढवला आणि हरणाच्या दिशेने जाऊ लागली. हरणालाही मगरीची चाहूल लागल्याने ते सुद्धा अधिक वेगाने आणि सर्व ताकद लावून किनाऱ्यावर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत होतं. एका क्षणी मगर या पर्यटकांच्या बोटीच्या दिशेनंही येऊ लागली. मात्र नंतर पुन्हा हरणाचा पाठलाग करु लागली.

मगरीने झडप घातली अन्...

हरीण किनाऱ्यापासून अगदी काही अंतरावर असताना मगरीने त्याच्यावर झडप घातली. काही क्षण हरीण पाण्याखाली गेलं. आता सारं काही संपलं, हरीण मगरीच्या तावडीत सापडलं असं वाटत असतानाच अचानक उसळी घेऊन ते वर आलं. त्यानंतर त्याने मगरीच्या जबड्यात आपण सापडू नये म्हणून उड्या मारतच किनाऱ्यापर्यंत गेलं आणि थोडक्यात वाचलं.

महिलांचा आरडाओरड आणि जल्लोष

हा सारा प्रकार पर्यटकांच्या नजरेसमोर सुरु असल्याने बोटीमधील महिला पर्यटक घडामोडींप्रमाणे आरडाओरड करुन आपल्या भावना व्यक्त करत असल्याचं ऐकू येत आहे. हरीण सुखरुपणे बाहेर आल्यानंतर या महिलांनी आरडाओरड करुन आनंद साजरा केल्याचंही ऐकू येत आहे. कापरी यांनी, "एक टॉप क्लास क्लायमेक्स" अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ...

या व्हिडीओला 26 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.