एकाच कुटुंबातल्या ११ जणांचे मृतदेह सापडले, धक्कादायक माहिती समोर

दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Jul 1, 2018, 08:39 PM IST
एकाच कुटुंबातल्या ११ जणांचे मृतदेह सापडले, धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातले १० मृतदेह दोरीला लटकवलेले होते. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. तर ७७ वर्षांच्या एका महिलेचा मृतदेह जमिनीवर पडला होता. मृत्यू झालेल्यांपैकी दोन जणं अल्पवयीन होते. नारायण देवी(वय ७७), त्यांची मुलगी प्रतिभा(वय ५७) आणि दोन मुलं भवनेश (वय ५०) आणि ललित भाटिया (वय ४५) अशी त्यांची नावं आहेत.

भवनेशची बायको सविता(वय ४८) आणि त्यांची तीन मुलं मीनू(२३), नितू (२५) आणि ध्रुव(१५) यांचेही मृतदेह घरात सापडले. ललितची पत्नी टीना(४२) आणि त्यांचा मुलगा शिवम(१५) यांचा मृत्यू झाला आहे. प्रतिभा यांची मुलगी प्रियांका(३३) दोरीला लटकलेली आढळली. मागच्याच महिन्यात प्रियांकाचा साखरपुडा झाला होता. या वर्षाच्या शेवटी तिचं लग्न होणार होतं.

मृत्यू झालेल्यांच्या घरातून पोलिसांना रजिस्टर आणि धार्मिक नोट आणि हातानं लिहिलेल्या काही नोट्स पोलिसांना मिळाल्या आहेत. हे संपूर्ण कुटुंबा विशिष्ट धार्मिक पद्धतीचा अवलंब करत होती. तोंडावर ज्या पद्धतीनं पट्टी बांधण्यात आली आहे, याचं सगळं वर्णन या पुस्तकांमध्ये करण्यात आल्याचं पोलीस म्हणाले. या कुटुंबाच्या घरात किर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचंही आयोजन होत असे, अशा माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली आहे. आता क्राईम ब्रांच याची चौकशी करणार आहे. ही केस आता क्राईम ब्रांचला ट्रान्सफर करण्यात आली आहे. तसंच ज्या नोट्स मिळाल्यात त्यातून काही धार्मिक धागेदोरे समोर आल्याचं वक्तव्य पोलिसांनी केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.