दुसरी लाट ओसरतेय! आज समोर आलेल्या आकडेवारीने दिलासा; परंतू चिंता कायम

गेल्या आठवड्यात दर दिवसाला 4 लाखांचा आकडा पार करणारी रुग्णसंख्या आता कमी व्हायला सुरूवात झाली आहे

Updated: May 11, 2021, 07:40 AM IST
दुसरी लाट ओसरतेय! आज समोर आलेल्या आकडेवारीने दिलासा; परंतू चिंता कायम title=

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर सुरूच असताना काही दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात दर दिवसाला 4 लाखांचा आकडा पार करणारी रुग्णसंख्या आता कमी व्हायला सुरूवात झाली आहे. मागील 24 तासात देशभरात कोविड19 च्या 3.29 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

कोरोना विषाणूपासून होणाऱ्या मृत्यूंनी वाढली चिंता

 भारतात कोविड 19 च्या रुग्णसंख्येत कमी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3879 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी कोरोनामुळे 3754 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच, नवीन कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी, मृत्यूचा आकडा वाढताच असल्याचे दिसून येत आहे.
 
 वल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 29 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या 24 तासात 35 हजाराहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले होते.

 ऍक्टिव रुग्णांच्या संख्येत घट

देशभरात ऍक्टिव रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 37 लाख 20 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर हीच संख्या गेल्या आठवड्यात सोमवारी 37 लाख 50 हजार इतकी होती.