नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील उत्तरेकडील भागात असलेल्या बुराडी परिसरात धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील संत नगर परिसरात एकाच घरात एक दोन नव्हे तर, चक्क ११ व्यक्तिंचे मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहांमध्ये ७ महिला तर, ४ पुरूषांचा समावेश आहे. सांगितले जात आहे की, ११ मृतदेहांपैकी काहींचे हातपाय बांधले होते. तर, काहींच्या डोळ्यांवर चिकटपट्टी लावली होती.
एकाच घरात इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह मिळाल्यामुळे राजधानी दिल्ली हादरून गेली. तर, पोलीस दलात एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे मृतदेह दोन कुटुंबांचे असून, त्यांची गळफास लाऊन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या व्यक्तिंनी सामूहिक आत्महत्या केली आहे की, हे हत्याकांड हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत मात्र एकच खळबळ उडाली आहे.