मुंबई : भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक जाती धर्माचे लोकं राहतात. जेथे प्रत्येक लोकांकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात, ज्यांचं स्वतःचं महत्त्व आहे. भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये हाच फरक दिसून येतो. वास्तविक, प्रत्येक धर्मात लग्नाबाबत वेगवेगळ्या विधी असतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील विवाहसोहळ्यांनाही स्वतःच्या प्रथा आणि विधी असतात. विदाईच्या वेळी वधूकडून तांदूळ फेकण्याचा विधी यापैकीच एक आहे. या विधीमध्ये वधू घरातून बाहेर पडताना मागे तांदूळ फेकते. वधूनं असं करणे शुभ मानले जाते.
हा क्षण प्रत्येक वधू आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक भावनिक क्षण असतो. कारण याक्षणानंतर वधू आपलं माहेर सोडून कायमची सासरी जाणार असते. नववधू जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा तिची बहीण, मैत्रिण किंवा घरातील कोणतीही महिला हातात तांदळाचे ताट घेऊन तिच्या शेजारी उभी असते.
मग वधू त्याच ताटातून दोन्ही हाताने तांदूळ उचलते आणि मागे फेकते. वधूला मागे वळून न पाहता हे असं पाच वेळा करावं लागतं. वधूला हे तांदूळ मागे असे फेकावे लागते की, ते तिच्या मागे असलेल्या संपूर्ण कुटूंबावरती पडेल. त्यावेळी घरातील महिला नवरीच्या मागे आपला पदर पसरून तांदूळ गोळा करतात.
असं का करतात? या मागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत.
मान्यतेनुसार मुलगी ही घराची लक्ष्मी असते. अशा परिस्थितीत जिथे मुली असतात, त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. इतकंच नाही तर त्या घरात आनंद कायम राहतो. असे मानले जाते की जेव्हा वधू तांदूळ मागे फेकते तेव्हा ती तिचे घर धनाने भरून जावे अशी इच्छा करते.
अशीही एक समजूत आहे की मुलगी आपलं माहेर सोडून जात असली तरी या तांदळाच्या रुपात आपल्या आपल्या माहेरासाठी प्रार्थना करत राहते. अशा स्थितीत वधूने फेकलेले हे तांदूळ तिच्या माहेरच्या लोकांसाठी नेहमीच वरदान ठरतात.
वाईट नजरेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानेही हा विधी केला जातो. असे मानले जाते की वधू तिच्या माहेराहून निघून गेल्यावर, तिच्या कुटुंबातील सदस्यांना कोणाचीही वाईट नजर लागू नये, या कारणामुळे हा विधी केला जातो.
या विधीबद्दल आणखी एक समजूत आहे जी सांगते की एक प्रकारे वधूने तिच्या पालकांचे आभार मानण्याची पद्धत आहे. वधू या विधीच्या रूपात प्रार्थना करून सासरी जाते कारण त्यांनी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत तिच्यासाठी खूप काही केले आहे, ज्याबद्दल ती अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करते.
तांदूळ हे संपत्तीचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पैशाचा तांदूळ असेही म्हणतात. इतकेच नाही तर धार्मिक पूजेमध्ये तांदूळ हे पवित्र गोष्टी मानली जाते, कारण तांदूळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा वधू निघून जाते, तेव्हा ती तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आनंदी आणि समृद्ध जीवनाची कामना करते, त्यामुळे या विधीसाठी फक्त तांदूळ वापरला जातो.