दत्तक मुलीला गरम सळईने मारहाण, अंगावर गरम पाणी ओतलं, गच्चीवर हात बांधून...; डॉक्टर दाम्पत्याने गाठली क्रौर्याची सीमा

Crime News: दत्तक मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केली आहे. प्राथमिक तपासात डॉक्टर बरुआ यांनी चिमुरडीला लोखंडी सळईने मारहाण केली तसंच तिच्या अंगावर गरम पाणी ओतल्याचं समोर आलं आहे.  

शिवराज यादव | Updated: May 8, 2023, 03:46 PM IST
दत्तक मुलीला गरम सळईने मारहाण, अंगावर गरम पाणी ओतलं, गच्चीवर हात बांधून...; डॉक्टर दाम्पत्याने गाठली क्रौर्याची सीमा title=

Crime News: लग्नानंतर मूल झालं की संसार पूर्ण होतो असं म्हणतात. पण अनेक दांपत्यांना हे सुख लाभत नाही. यामुळे मग मूल दत्तक घेण्याचा विचार केला जातो. पण काहीजण मात्र आपल्या रक्ताचं मूल हवं असा हट्ट धरतात. याचं कारण दत्तक घेतलेल्या मुलाला आपण लळा लावू शकू का अशी भीती वाटत असते. मग त्यातूनच त्या मुलांवर अत्याचार होण्याची भीती असते. दरम्यान आसाममध्ये असाच काहीसा प्रकार घडला असून, ही घटना वाचल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. 

दत्तक घेतलेल्या मुलीवर डॉक्टर दांपत्याने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दांपत्याला बेड्या ठोकल्या आहेत. हे डॉक्टर दांपत्य गुवाहाटीमधील असून काही वर्षांपूर्वी त्यांनी मुलीला दत्तक घेतलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

चिमुरडीला भर उन्हात गच्चीवर खांबाला बांधण्यात आलं होतं. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांना फोन करुन यासंबंधी माहिती दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली. 

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि जनरल सर्जन डॉ वल्लीउल इस्लाम यांना पोलिसांनी ५ मे रोजी गुवाहाटीच्या मणिपुरी बस्ती भागात असलेल्या त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितले की, त्यांची पत्नी संगीता बरुआ या मनोचिकित्सक यांना शनिवारी रात्री घरातून अटक करण्यात आली. मेघालयातील री भोई जिल्ह्यात त्या लपून बसल्या होत्या असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी दांपत्याविरोधात सुओ मोटो गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या खुनाचा प्रयत्न (307), स्वेच्छेने गंभीर दुखापत (325), चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणे अशा वेगवेगळ्या कलमांतर्गंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टर मुलीला गरम सळईने मारहाण करायचा. तसंच तिच्यावर गरम पाणी ओतत असे. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. 

पोलिसांनी दांपत्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीचीही चौकशी केली आहे. यावेळी तिने मुलगी ऐकत नसल्याने तसंच मस्ती करत असल्याने दांपत्याने तिला मुलीला शिक्षा म्हणून गच्चीवर बांधून ठेवण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली आहे. 

दांपत्याचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. जवळपास साडे तीन वर्षांपूर्वी त्यांनी मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यांच्याविरोधात याआधीही अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र कोणीही त्यांच्याविरोधात अधिकृतपणे तक्रार दाखल केली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

गुवाहाटीस्थित बालहक्क कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, याआधीही डॉक्टर दांपत्य आपल्या दत्तक मुलीवर अत्याचार करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. पण त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडत नव्हते. पण अखेर शेजाऱ्यांना मुलीला गच्चीवर बांधल्याचं दिसलं आणि त्यांची हा क्रूर चेहरा समोर आला.