नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांमध्ये १३ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसानंतर तापमानात कमी आली आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पाऊस झाला.
मुसळधार पावसानंतर दिल्ली आणि नोएडामधील तापमानाचा पारा खाली आला आहे. पावसामुळे प्रदूषणाचा स्तरही कमी झाल्याचं बोललं जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत, दिवसाही थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.
१३ डिसेंबर रोजी अनेक शहरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये हवामान खराब होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये गारपीट आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचलमधील शिमलामध्येही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ ते ४८ तासांपर्यंत दक्षिण तमिळनाडू, दक्षिण केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. तेलंगाणामधील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पंजाबमधील अनेक भागातील हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. उत्तर हरियाणामध्ये पावसासह गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.