लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. काही क्षणांत दोन जीव एकत्र येतात आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होते. लग्नात सात जन्माच्या शपथा घेत लग्नगाठ बांधली जाते. नंतर सात जन्म हाच जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थनाही केली जाते. पण उत्तर प्रदेशात लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरा-नवरी लग्न मोडण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मंडपात अग्नीला साक्षी मानत घेतलेल्या शपथांचा काही वेळातच दोघांना विसर पडला होता. याचं कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
वृंदावन कोतवाली क्षेत्रातील गौरानगर येथे ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या आनंद अग्रवालचं हरियाणाच्या होडस येथील रेखाशी लग्न झालं होतं. 10 मे रोजी दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याने दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. रेखाचे कुटुंबीयही मुलीचं लग्न होणार असल्याने आनंदी होती. लग्नासाठी वाजत गाजत वरात काढण्यात आली होती.
हिंदू पद्धतीने नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. 11 मे रोजी मुलीची पाठवणी करण्यात आली. घरात सून आल्याने आनंद यांचं कुटुंबीय आनंदी होतं. सर्वांनी आपुलकीने तिचं स्वागत केलं. पण दुसऱ्या दिवशी होणाऱ्या गोंधळाची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. हे लग्न दुसऱ्या दिवशीच मोडणार आहे याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसावा.
सकाळी उठल्यानंतर नवरीमुलगी ओरडतच घराबाहेर आली. सर्वांना नेमकं काय झालं ते कळत नव्हतं. सूनेने घरातील सर्वांनाच शिव्या घालण्यास सुरुवात केली. यामुळे घरातील आनंदाचं वातावरण भांडणात रुपांतरित झालं. नेमकं काय झालं आहे हे सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर जी माहिती समोर आली ती ऐकल्यानंर नवऱ्यामुलाच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.
आधी पतीने आपली पत्नी वेडी असल्याचा दावा केला. तिची मानसिक स्थिती योग्य नसून आपल्याला खोटं सांगून हे लग्न केल्याचं तिने म्हटलं. आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्याने केला. यावर मुलीच्या भावाने नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याने काहीही ऐकण्यास नकार दिला तेव्हा त्याने आपल्या बहिणीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं मान्य केलं. यानंतर नवरामुलगा फसवणूक झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करु लागला. अखेर लग्न मोडण्याच्या अटीवरच तोडगा काढण्यात आला.