बंगळुरु : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला (Farmer) नेहमीच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं. राजकीय नेत्यांकडून केवळ आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. शेतकऱ्यांनाच्या शेती मालाला मिळणारा हमीभाव ही तर देशभरातील शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे. वर्षभर मेहनत करुन मोठ्या कष्टाने पीक घ्यायचं पण त्याला बाजार भावच मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात ओढला जातो. शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करणारी अशीच एक घटना समोर आली आहे.
शेतकऱ्याची क्रूर चेष्टा
कर्नाटकमधल्या (Karnataka) गडग जिल्ह्यातील शेतकऱ्याची शेती माल विकल्याची पावती सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याचं नाव पवडेप्पा हालिकेरी आहे. पवडेप्पाने मोठ्या कष्टाने आपल्या शेतात कांदा पिकवला. यंदा पीकही चांगलं आलं. 205 किलो कांदा घेऊन पवडेप्पा यांनी तब्बल 415 किलोमीटरचा प्रवास करत बंगळुरुमधल्या यशवंतपूर इथला बाजार गाठला. मोठ्या आशेने पवडेप्पा यांनी कांदा विक्रीसाठी ठेवला, पण तब्बल दोन क्विंटल कांदा विकून पवडेप्पा यांच्या हातात पडले फक्त 8.36 पैसे. या व्यवहाराची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका क्विंटलला 200 रुपये भाव
पवडेप्पा या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये भाव मिळाला. यातही 377 रुपये मालवाहतूक आणि 24 रुपये हमालीचे कापण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात उरले ते फक्त 8.36 रुपये. या शेतकऱ्याने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. त्याने या पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यासोबत त्याने आपला शेतमाल विकण्यासाठी बंगळुरुला येऊ नका असं आवाहान इतर शेतकऱ्यांना केलं आहे.
This is how The double engine Govt of @narendramodi & @BSBommai doubling the income of farmers (Adani)
Gadag farmer travels 415 km to Bengaluru to sell onions, gets Rs 8.36 for 205 kg! pic.twitter.com/NmmdQhAJhv
— Arjun (@arjundsage1) November 28, 2022
सर्वच शेतकऱ्यांची हीच व्यथा
ही व्यथा केवळ पवेडप्पा या शेतकऱ्याचीच नाही. बंगळुरुच्या यशवंतपूर बाजारात येणाऱ्या सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना 10 रुपयांपेक्षाही कमी पैसे मिळाले आहेत. पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा : कोरोनानंतर जगात 'Zombie Virus'चा धुमाकूळ? जगात येणार कोरोनापेक्षा भयंकर महामारी?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान
गडग जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्याने बंगळुरुच्या बाजारात 212 किलो कांदा विक्री केला त्याला एकूण 1000 रुपये मिळाले. पण कमीशन, ट्रांसपोर्ट, हमाली असे सर्व कापले जाऊन शिल्लक उरले फक्त 10 रुपये. यावर्षी आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.