पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित झारखंड दौऱ्यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन होण्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील राज्य सरकारने अजब निर्णय घेतला. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यक्रमात काळे कपडे, स्वेटर्स, पायमोजे, ब्लेझर्स, हॅण्डबॅग यांच्यावर वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ऐन थंडीमध्ये हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी ओळखपत्रही बंधनकारक करण्यात आल आहे.
पलामूचे पोलिस अधीक्षक इंद्रजित महाथा यांनी हे आदेश काढले आहेत. सुरुवातीला काळ्या रंगाचे बूट घालण्यावरही बंदी घालण्यात आली होती. पण सगळ्याच लोकांनी त्याला विरोध केल्यावर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि कार्यक्रमाला येताना काळ्या रंगाचे बूट घालण्यास परवानगी देण्यात आली. महाथा यांच्या आदेशात म्हटले आहे की, पाच जानेवारीला नरेंद्र मोदी झारखंडमध्ये येत आहेत. जे कोणी या कार्यक्रमाला येणार आहेत, त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालून न येण्यास सांगण्यात यावे. त्याचबरोबर कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे.
गेल्या महिन्यात रांचीमध्ये मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कार्यक्रमावेळी आंदोलनकर्त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला होता. नोकरीमध्ये कायम करण्याची आणि सरकारी शाळेतील शिक्षकांएवढे वेतन देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांचा आदर राखला जावा आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी आम्ही उपाययोजन केली आहे. कार्यक्रमाला येताना काळ्या रंगाचे बूट घालण्याला परवानगी देण्यात आली आहे. पण अन्य कोणतीही वस्तू काळ्या रंगाची आणू नका, असे महाथा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. आम्ही आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या संघटनांशीही चर्चा केली असून, त्यांनीही आम्हाला कार्यक्रमावेळी कोणतीही घोषणाबाजी किंवा निदर्शने केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे, असे महाथा यांनी स्पष्ट केले.