भारतापेक्षा पाकिस्तान जास्त आनंदी, तर हा देश ठरला सर्वात आनंदी!

संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन नेटवर्कचा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८ प्रकाशित करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार यूरोपिय देश फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Amit Ingole Updated: Mar 15, 2018, 10:32 AM IST
भारतापेक्षा पाकिस्तान जास्त आनंदी, तर हा देश ठरला सर्वात आनंदी! title=

वाशिंग्टन : संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन नेटवर्कचा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८ प्रकाशित करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार यूरोपिय देश फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

भारताचा कितवा क्रमांक

या रिपोर्टमध्ये भारत आपला शेजारी देश पाकिस्तान पेक्षाही आनंदाच्या बाबतीत मागे आहे. या आनंदी देशांच्या यादीत भारताला १३३वा क्रमांक मिळालाय. १५६ देशांच्या या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये ८ यूरोपिय देश आहेत. तर पहिल्या २० देशांमध्ये आशियातील एकही देश नाहीये. 

अमेरिकेचा कितवा क्रमांक

या रिपोर्टमध्ये अमेरिकेला १८व स्थान देण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये भारत ११२ व्या स्थानावर होता. पण यावेळी भारत ११ क्रमांकाने मागे आलाय. याचा अर्थ देशातील आनंद कमी झालाय. तेच सर्वात कमी आनंदी देश बुरुंडी हा आहे. या देशाला या यादीत १५६वा क्रमांक देण्यात आलाय. 

सर्वात आनंदी देश कोणता?

संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१७ मध्ये याआधी पहिल्या क्रमांकावर नॉर्वे हा देश होता. पण यावेळी त्यांच्याकडून हा बहुमान हिरावला गेलाय. यावेळी हा बहुमान फिनलंड देशाला मिळालाय. फिनलंड हा एक छोटा यूरोपिय देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ ३.३८ लाख वर्ग किमी इतकं आहे. या देशाची लोकसंख्या ५५ लाख इतकी आहे. २०१७ च्या यादीत फिनलंड हा देश ५व्या स्थानावर होता.  

अशी बनवली गेली यादी

संयुक्त राष्ट्राची संस्था सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन नेटवर्कने ही यादी तयार करण्यासाठी अनेक गोष्टींना ग्राह्य धरले. संस्थेने २०१५ ते २०१७ मधील ६ वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे एक प्रश्नसूची तयार केली. यात प्रति व्यक्ती जीडीपी, सामाजिक सहयोग, उदारता आणि भ्रष्टाचार, सामाजिक स्वतंत्रता, आरोग्य जीवनाच्या संभावनेसहीत इतरही काही गोष्टींच्या आधारे प्रश्न विचारण्यात आले. 

पहिल्या १० मध्ये हे देश

पहिल्या क्रमांकावर फिनलंड. २०१७ मध्ये पहिल्या स्थानावर असलेला नॉर्वे यावेळी दुस-या स्थानावर आहे. तिस-या स्थानावर डेनमार्क. आइसलंड आणि स्वित्झर्लंड क्रमश: ४ थ्या आणि ५व्या स्थानावर आहे. नेदरलंड ६व्या आणि कॅनडा ७व्या स्थानावर आहे. या यादीत न्यूझीलंडला ८वं स्थान मिळालंय. तर स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया क्रमश: ९व्या आणि १०व्या स्थानावर आहे. 

शेजारी देशाच्या मागे राहिला भारत

भारताला आनंदी देशांच्या यादीत १३३वं स्थान देण्यात आलं आहे. २०१७ मध्ये भारताचं स्थान ११२व्या क्रमांकावर होतं. यावेळी भारताच्या शेजारी देशांमध्ये सर्वात जास्त आनंदी पाकिस्तान हा देश आहे. पाकिस्तानला या यादीत ७५व्या क्रमांकावर स्थान देण्यात आलं आहे. तर चीन ८६ व्या स्थानावर आहे. भूतान ९७, नेपाळ १०१, बांगलादेश ११५, श्रीलंका ११६ आणि म्यानमारला या यादीत १३० वं स्थान देण्यात आलंय. 

श्रीमंत झाला अमेरिका, पण आनंद कमी

अमेरिका गेल्या काही वर्षात श्रीमंत झालाय. पण आनंदाच्या बाबतीत हा देश मागे पडलाय. अमेरिका लागोपाठ या यादीत खालच्या क्रमांकावर घसरत आहे. आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये अमेरिका १४व्या स्थानावर होता. २०१२ पासून प्रकाशित होत असलेल्या या रिपोर्टमध्ये अमेरिका कधीही पहिल्या दहा देशांमध्ये आला नाहीये.