अनैसर्गिक सेक्स घटस्फोटाचे कारण ठरू शकतो: कोर्ट

.......

Updated: Jun 9, 2018, 02:16 PM IST
अनैसर्गिक सेक्स घटस्फोटाचे कारण ठरू शकतो: कोर्ट title=

चंडीगड: जबरस्तीने किंवा अनैतिक पद्धतीने केलेले शरीरसंबंध हे घटस्फोटासाठी कारण ठरू शकतात, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावनीस नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाने तब्बल चार वर्षानंतर एका याचिकेवर सुनावनी घेतली. बठिंडाच्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही सुनावनी घेतली. या सुनावनीदरम्यान, न्यायालयाने हे मत नोंदवले.

दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते की, महिलेने हे सिद्ध करायला हवे की, तिच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केले आहेत. महिलेकडून अशा प्रकारचे कोणतेही पुरावे न्यायालयाकडे सादर करण्यात आले नसल्याचेही कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमएमएस बेदी आणि हरिपाल वर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटले की, कधी कधी असेही होते की, याचिकाकर्त्याचा दावा चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावला जातो. जबरदस्तीचे शारीरिक संबंध किंवा अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी पती किंवा पत्नीला प्रवृत्त करण्यात येते व त्यामुळे संबंधीत व्यक्तीस वेदना होतात. अशा वेळी असे संबंध हे घटस्फोटाचे कारण नक्कीच ठरू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले.

कॉम्प्यूटर सायन्समध्ये पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर युवतीचा विवाह बिहारच्या एका व्यक्तीसोबत जानेवारी २०१७मध्ये झाला होता. या लग्नापासून संबंधीत महिलेला एक अपत्यही आहे. महिलेने दाखल केलेल्या याचिकेनुसार, तिच्या माहेरच्यांकडून सासरच्यांना हुंडा दिला होता. तसेच, युवतीला आणि तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आले होते की, मुलगा अभियंता (इंजिनिअर) आहे. पण, ते सगळे खोटे होते. वास्तवात मुलगा इंजिनिअर नव्हताच. याचिकेत असेही म्हटले होते की, आपली शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा पती तिला मारहाण करत असे व तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध करत असे. 

दरम्यान, याचिकाकर्त्या महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.