नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोक्याच्या क्षणी भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात मोठी भर पडली आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत फ्रान्सकडून भारताला ६ राफेल विमाने मिळणार आहेत. शत्रूचा कर्दनकाळ असा लौकिक असणाऱ्या या राफेल विमानांमुळे भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढणार आहे. एकीकडे चीनकडून सीमेवर सैन्याची आणि युद्धसामुग्रीची जमवाजमव सुरु आहे. अशावेळी भारतीय वायूदलाच्या ताफ्यात राफेल विमाने दाखल होणार, ही बातमी शत्रूच्या मनात नक्कीच धडकी भरवणारी ठरेल.
भारताने लडाखमध्ये पाठवले आर्मीचे ३ डिविजन, चीनला फुटला घाम
ही विमाने मे महिन्यातच भारताला मिळणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे फ्रान्सकडून राफेल विमाने मिळायला उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने फ्रान्सकडे राफेल विमाने लवकर मिळावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार फ्रान्समध्ये राफेल विमानांच्या बांधणीच्या कामाला वेग आला आहे.
चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक
त्यामुळे २७ जुलैपर्यंत सहा राफेल विमाने वायूदलाच्या अंबाला येथील तळावर दाखल होतील. यापूर्वी पहिल्या टप्प्यात भारताला केवळ चार राफेल विमाने मिळणार होती. मात्र, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सकडून आणखी दोन राफेल विमाने भारताला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून 'द हिंदुस्थान टाईम्स'ला देण्यात आली. भारतीय वायूदलाच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने फ्रान्सशी ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी तब्बल ५९ हजार कोटीचा करार केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दसॉल्ट कंपनीकडून एकूण १० राफेल विमाने तयार करण्यात आली आहेत. यापैकी सहा विमाने भारतात पाठवण्यात येतील. जुलैच्या अखेरीस ही विमाने भारताच्या दिशेने उड्डाण करतील. या प्रवासादरम्यान ही विमाने केवळ अबुधाबीच्या अल दाफरा या तळावर थांबतील. भारतीय वैमानिकच या विमानांचे सारथ्य करतील. दहापैकी केवळ सहा विमानेच भारतात आणण्यात येतील. उर्वरित चार विमाने भारतीय वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात येतील.