Goa Hotel Manager Killed Wife: गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय गुप्तपणे व प्लान रचून पत्नीची हत्या केली होती. ही हत्या अपघात वाटावा असा बनावही त्याने केला. मात्र, एका व्हिडिओने त्याची पोलखोल केली आहे.
पोलिसांना दीक्षाचा मृतदेह समुद्र किनारी सापडला होता. प्राथमिकदृष्ट्या, गौरवने अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी जवळपास 3.45 वाजता गौरव त्याच्या पत्नीला घेऊन समुद्र किनारी फिरायला गेला होता. मात्र तिथे गेल्यावर सुनसान ठिकाणी नेऊन गौरवने दीक्षाला समुद्रात ढकलून दिले. पोलिसांना महिलेच्या शरीरावर गंभीर जखमांचे निशाणही आढळले आहेत.
गौरवने त्याच्या पत्नीला समुद्रात ढकलून दिल्यानंतर तो अपघात असल्याचा बनाव करु लागला. पत्नी समुद्रात वाहून गेल्याचे त्याने लोकांना सांगितले. तसंच, ही दुर्घटना ही अपघात असल्याचे त्याने सगळ्यांना पटवून दिले. पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. गौरवने सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका स्थानिक व्यक्तीने काढलेल्या व्हिडिओमुळं त्याचा बनाव समोर आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गौरव समुद्र किनाऱ्यावरुन बाहेर येतोय आणि आरडाओरडा करण्याआधी पत्नीचा खरंच मृत्यू झालाय का याची पडताळणी करतोय. या व्हिडिओनंतर गौरवला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरवहा उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील मुळ रहिवाशी आहे. तर, दीक्षादेखील लखनऊचीच आहे. सध्या पोलिस गौरवची चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दीक्षाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या कुटुंबीयांनी एकच धक्का बसला आहे.
अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ