Gold Price at All Time High: ऐन सणासुदीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेटचा दर जाणून घ्या

Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात 1 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जाणून घेईया आज काय आहेत सोनं-चांदीचे दर   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 26, 2024, 11:04 AM IST
Gold Price at All Time High: ऐन सणासुदीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ,  24 कॅरेटचा दर जाणून घ्या title=
gold touches all time high above 75300 rs per 10 gram check rates in mumbai maharashtra

Gold Price at All Time High: मौल्यवान धातुच्या दरांत उच्चांकी वाढ होत आहे. कमोडिटी बाजार ते सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याची किंमत 77,800 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे. तर, चांदीदेखील 93,000 हजारांवर पोहोचली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यामुळं ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले आहे. 

गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव अधिकच वाढू लागले आहेत. अमेरिकन बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि सोन्या चांदीला वाढलेली प्रचंड मागणी तसेच सोन्या चांदीची वाढलेली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक याचा परिणाम हा सोन्याच्या दारावर होत असल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे.  तसंच, सीमा शुल्कात घट केल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. सणा-सुदीचे दिवस असल्यानेही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जात आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. 

पुढच्याच महिन्यात नवरात्री व दिवाळी-दसरा हे सण आहेत. या सणासुदीच्या काळात सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. भारतीय संस्कृतीनुसार सोन्याचा संबंध पुराणाशीही जोडला जातो. त्यामुळं दसरा व धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत सोन्याचा दर काय?

सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 77057 रुपयांवर पोहोचली आहे. तर, बुधवारी प्रतितोळा सोन्याची किंमत 76187 रुपयांवर स्थिरावली होती. आज सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यानुसार आज एक ग्रॅम सोन्याची किंमत 7720 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोनं 7078.03 प्रतिग्रॅम आहे. या आठवड्यात सोनं 1100 रुपयांहून अधिक महाग झाले आहे. 

चांदीचे दर काय

आज मुंबईत चांदीचे दर प्रतिकिलो 95100 रुपयांवर स्थिरावले आहेत.