Ration Card Link to Aadhaar: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2023 ही आधारशी रेशन लिंक करण्याची अंतिम तारीख आहे. एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असण्याचा प्रकार टाळण्यासाठी सरकारने ते लिंक करण्याची सुविधा सुरू केली आहे. रेशनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केल्यानंतर ग्राहकांना यासंबंधी होणारे त्रास टाळता येऊ शकतात.
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाइटवर जा
तुमच्या सध्याच्या कार्डशी आधार लिंक करण्याचा पर्याय निवडा.
तुमचे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर टाका.
'continue/submit' चा पर्याय निवडा.
तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो टाका.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस पाठवला जाईल.
रेशन कार्ड आधारशी लिंक केल्यानंतर कोणतीही व्यक्ती निश्चित कोट्यापेक्षा जास्त रेशन घेऊ शकणार नाही. अनधिकृतपणे रेशन घेणाऱ्या व्यक्ती यातून पकडल्या जाऊ शकतात. यामुळे गरजूंपर्यंत धान्य मिळण्यास मदत होणार आहे.