बंगळुरु : कर्नाटक सत्ता संघर्षानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार सत्तेत बसणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे शपथ घेणार आहेत. त्यासाठी दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमत्री शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार करण्यात आलेय. काँग्रेस कार्यालयापासून ते बंगळुरुमधील कुमारस्वारी यांच्या निवासस्थानापर्यंत मोठा जल्लोष पाहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे शपथविधी सोहळ्यासाठी पारंपरिक स्वरुपात कलश सजविण्यात आलेत.
भाजप मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कुमारस्वामी यांना राज्यपाल यांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिलाय. आजच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेय. दरम्यान, त्याआधी सत्तेत किती मंत्री असावेत आणि कोणाला कोणते मंत्रीपद द्यावे यावरुन जेडीएस आणि काँग्रेसमध्ये जोरबैठका सुरु होत्या. मात्र, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि किती कोणाकडे मंत्री असतील यावर तोडगा निघाला.
त्यानुसार काँग्रेसला उपमुख्यमंत्री आणि विधान सभेचे अध्यक्ष पद देण्यात येणार आहे. काँग्रेस आणि जनता दलाच्या सरकारमध्ये एकूण ३४ मंत्री असणार आहेत. यामध्ये काँग्रेसला २२ मंत्रीपदे तर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासहित १२ मंत्रीपदे जेडीएसला मिळणार आहेत. काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांची मंत्रीमंडळ निवडीविषयी चर्चा सुरू होती. या चर्चेत घेतलेल्या निर्णयाची माहिती काँग्रेसचे नेते केसी वेनुगोपाळ यांनी माध्यमांना दिली.
आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांचा शपथविधी झाल्यानंतर बहुमत सिध्द केले जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची निवड केली जाईल. आम्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेतला आहे, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड २५ मे रोजी होईल असे एच.डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.