जयपूरमध्ये पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवा चौथच्या दिवशी पतीला घरी येण्यास उशीर आला होता. यामुळे पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून पत्नीने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. तर पतीनेही यानंतर टोकाचं पाऊल उचललं.
रविवारी नांगल सिरस गावातील हरमरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घनश्याम बंकर (38) रात्री उशिरा घरी आला होता. यामुले त्याचा 35 वर्षीय पत्नी मोनिकासह वाद झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोनिका रात्री 12.30 च्या सुमारास रागाच्या भरात घर सोडून गेली होती. यावेळी घनश्याम तिचा पाठलाग करत मागून गेला. त्यानंतर काही वेळातच मोनिकाने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली आणि तिचा मृत्यू झाला. पत्नीने आत्महत्या केल्याने धक्का बसलेल्या अवस्थेत धनश्याम घऱी परतला. यावेळी त्यांची दोन मुलं घऱातील वेगवेगळ्या खोलीत झोपली होती. घनश्यामने घरातच गळफास लावून घेतला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी घनश्यामने आपल्या भावाने व्हॉट्सअपवर मेसेज करुन आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगितलं. "भावा, मी हारलो, सॉरी! माझ्या बायकोच्या अंगावरुन ट्रेन गेली," असं त्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं.
“या जोडप्याच्या लग्नाला 15 वर्षं झाली होती. त्यांना दोन मुले आहेत. करवा-चौथसाठी पती वेळेवर न आल्याने पत्नी संतापली आणि रागाच्या भरात घरातून निघून गेली. पतीही तिच्या मागे जात असताना तिने चालत्या ट्रेनसमोर उडी मारली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने हादरल्यानंतर तो घरी परतला आणि गळफास लावून घेतला. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीत कामाला होता आणि मोनिका गृहिणी होती.