लखनौ : T20 विश्वचषक 2021 (T20 world cup 2021) मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करताना एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. महिलेच्या पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील रामपूरचे आहे. T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानच्या विजयानंतर, महिला आणि तिच्या कुटुंबाने फटाके फोडल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर महिलेने पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटसही टाकले होते. (Husband files case against wife for celebrating Pakistan's victory)
पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पतीने महिला आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सदर व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार इशान मियाँ हा रामपूरमधील अझीम नगर येथील रहिवासी आहे. तो दिल्लीत काम करतो. इशानची पत्नी राबिया शम्सी ही रामपूरच्या गंज भागात तिच्या माहेरच्या घरी राहते. 2021 च्या T20 विश्वचषकातील सामना पाकिस्तानने जिंकला. इशान मियांच्या लक्षात आले की त्याची पत्नी राबिया शम्सीने सामन्यानंतर तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पाकिस्तान झिंदाबादचे स्टिकर लावले. याशिवाय राबियाने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंवरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे संतप्त झालेल्या ईशान मियाँने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पतीविरुद्ध हुंडाबळीचा खटला
विशेष म्हणजे तक्रारदार ईशान मियाँ यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. राबिया शम्सीने रामपूरमधील गंज पोलीस ठाण्यात इशान मियाँविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला होता. याचा बदला घेण्यासाठी ईशान मियाँने पत्नी आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात आहे.
24 ऑक्टोबर 2021 रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs pakistan) यांच्यात क्रिकेट सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर सेलिब्रेशन केल्याबद्दल उत्तर प्रदेशमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आग्रा येथे तीन काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.