झोपलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने २ वेळेस कोब्रा फेकला, पण तो चावला नाही, अखेर....

दक्षिण भारताच्या केरळमधून एक गंभीर आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

Updated: Oct 25, 2021, 10:27 PM IST
झोपलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने २ वेळेस कोब्रा फेकला, पण तो चावला नाही, अखेर....

कोल्लम : दक्षिण भारताच्या केरळमधून एक गंभीर आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ही घटना समोर आणण्यामागे तपासयंत्रणांचं मोठं यश आहे. ही सत्य घटना एखाद्या क्राईम सिनेमापेक्षा काही कमी नाही. या घटनेबद्दल तुम्ही जितकं जाणून घेण्याचा प्रयत्न कराल, तितके तुम्हाला जास्त प्रश्न पडू लागतील आणि तुम्ही या घटनेत आणखी गुंतत जाल. कारण ही घटना सत्य असली तरी रंजक आहे, पण दुर्देवाने यात एका महिलेची हत्या झाली आहे.

७ हजार रुपयाला कोब्रा विकत घेतला आणि...

सूरज कुमार नावाच्या 28 वर्षीय व्यक्तीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जगातील सर्वात विषारी सापांपैकी, कोब्रा साप 7 हजार रुपयांना विकत घेतला होता. या कोब्रा सापाला त्याने प्लास्टिकच्या बरणी ठेवले.

त्या बरणीत साप जिवंत राहावा यासाठी सुरजने त्याला लहान छिद्र पाडली. जेणेकरून कोब्रा आत जिवंत राहील. त्यानंतर त्याने ती बरणी एका पिशवीत टाकून 13 दिवसांनी  सुमारे 44 किलो मीटर अंतरावर असलेल्या आपल्या सासरी आणली. त्याचा हा सगळा आटापिटा सुरू होता, तो फक्त त्याच्या बायकोला मारण्यासाठी.

सूरजच्या आयुष्यात उत्तरा आली पण....

सूरज आणि उत्तराची भेट दोन वर्षांपूर्वी विवाह संस्थेद्वारे झाली होती. सूरजचे वडील रिक्षाचालक आणि आई गृहिणी आहे. उत्तरा सूरजपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे आणि तिला लर्निंग डिसअॅबिलीटी आहे, ज्यामुळे तिला नवीन गोष्टी शिकण्यात आणि समजून घेण्यात अडथळा निर्माण व्हायचा.

उत्तरा एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती, परंतु तिच्या या अपंगत्वामुळे तिचे लग्न जमत नव्हते. उत्तराचे वडील व्यापारी आणि आई निवृत्त मुख्याध्यापक आहेत.

बायकोची काळजी घेण्यासाठी दरमहा ८ हजार रुपये

जेव्हा उत्तरा आणि सुरजचे लग्न झाले, तेव्हा सूरजने उत्तराच्या आई-वडिलांकडून ४८.७ तोळे सोने, सुझुकी सेडान कार आणि ४ लाख रुपये रोख हुंडा घेतला होता. तसेच त्याला उत्तराची काळजी घेण्यासाठी दरमहा 8 हजार रुपये मिळत होते. परंतु उत्तराला कंटाळलेल्या सूरजने तिला ठार करण्याचा निश्चयच केला होता.

पहिल्यांदा उत्तराला साप चावला...

सुरूवातीला उत्तराला एक साप चावला, त्यानंतर ती तब्बल 52 दिवस हॉस्पिटलमध्ये होती, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती तिच्या आईच्या घरी परतली. त्यावेळेस रसेल वायपर नावाच्या विषारी सापाने तिला दंश केला होता ज्यासाठी तिच्या पायावर तीन शस्त्रक्रिया झाल्या.

झोपलेल्या पत्नीच्या अंगावर साप फेकला

तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की, उत्तराची तब्येत सुधारत असताना, 6 मेच्या रात्री सूरजने तिला फळांच्या रसामध्ये एक ग्लास सॅडेशन मिसळून दिला. तेव्हा उत्तरा बेहोश झाली, त्यानंतर सूरजने कोब्राचा डबा बाहेर काढला आणि झोपलेल्या पत्नीवर साप फेकला.

दोन वेळेस साप फेकला पण, तो चावला नाही...यानंतर

पण साप तिच्यावर हल्ला करण्याऐवजी तेथून पळून गेला, सुरजने त्या धावत्या सापाला उचलून उत्तराकडे पुन्हा फेकले, पण तो साप पुन्हा तिला दंश न करताच निघून गेला.

त्याने कोब्राला मानेत पकडला

त्यानंतर संतापलेल्या सूरजने जो निर्णय घेतला त्यामुळे तो या सगळ्या प्रकरणात पूरता फसला. सुरजने तिसऱ्या प्रयत्नात कोब्राच्या मानेला पकडून उत्तराच्या डाव्या हाताच्या दिशेने नेले. तेव्हा संतप्त सापाने उत्तराला दंश केलं.

रुग्णालयाने पोलिसांना बोलावून घेतलं...

त्यानंतर सकाळी नातेवाईकांनी उत्तराला जेव्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि तिला विषबाधा झाल्याचे सांगितले आणि रुग्णालयाने पोलिसांना बोलावले.

जेव्हा उत्तरा झोपली होती...

उत्तराच्या आईने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तराच्या खोलीत गेली, तेव्हा तिला तिची मुलगी अंथरुणावर पडलेली दिलली आणि तिचे तोंड उघडे होते, तिचा डावा हात एका बाजूला लटकत पडलेला होता.

उत्तराच्या आईने पुढे पोलिसांना सांगितले की सूरजही त्या खोलीत होता. जेव्हा तिने तिच्या जावयाला याबद्दल विचारले, तेव्हा सुरजने उत्तर दिले, "मला झोपताना तिला त्रास द्यायचा नव्हता."

तुम्ही कोब्राला भडकवत नाही, तोपर्यंत कोब्रा....

परंतु जेव्हा या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी केली गेली, तेव्हा पशुवैद्यक मविश कुमार यांनी पोलिसांना सांगितले की, "जोपर्यंत तुम्ही कोब्राला भडकावत नाही, तोपर्यंत कोब्रा चावत नाही, त्यामुळे सूरजने त्याला पकडले आणि त्याच्या पत्नीला दंश करण्यास भाग पाडले होते."

पुरावे साफ केले पण अडकला

परंतु सुरजने यासंदर्भातील सगळे पुरावे साफ केले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ज्यामुळे त्यांना सुरूवातीला यासंदर्भात पुरावे लगेच मिळाले नाही. परंतु सखोल तपासणी केल्यानंतर पोलिसांना लक्षात आले की, सूरजने ज्यूस दिलेला ग्लास नीट धुतला होता, त्याने सापाला हाताळण्यासाठी वापरलेली काठी आणि त्याच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड देखील नष्ट केले.

शवविच्छेदन अहवालात उत्तराच्या डाव्या हातावर दोन जखमा आढळल्या, तसेच रक्त आणि व्हिसेरा नमुन्यांमध्ये कोब्रा विष आणि गुंगीच्या औषधांची उपस्थिती दिसून आली.

पोलिसांचा ७८ दिवसांचा तपास आणि पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक

पोलिसांनी या प्रतकरणात सखोल चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना या प्रकरणात खूप गोष्टी सापडल्या 78 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी 1 हजारपेक्षा जास्त पानांच्या आरोपपत्रासह चाचणी सुरू केली. उत्तराच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सूरजला २४ मे रोजी पत्नीच्या असाधारण मृत्यूप्रकरणी अटक केली.

तपास यंत्रणांचं खरं यश

पोलिसांनी त्याच्या घरामागे मेलेला कोब्रा साप ताब्यात घेतला, ज्या बरणीत साप आणला ती देखील सापडली, एवढंच नाही उत्तराला बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेली औषधं त्याच्या गाडीत सापडली, पोलिस येथेच थांबले नाहीत, त्यांनी पहिला साप ११ हजार रुपयाला आणि नंतर कोब्रा गारुड्याकडून ७ हजार रुपयांना विकत आणल्याचं शोधून काढलं.

एवढंच नाही सूरज सतत सापांचा दंश आणि सापांच्या विषाविषयी ऑनलाईन सर्च करत असल्याचे पुरावे पोलिसांनी समोर आणले.

न्यायालयात सिद्ध करण्यासाठी खोलीत पुन्हा कोब्रा सोडला

जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा पशुवैद्यकाने न्यायालयाला सांगितले की, कोब्रा खिडकीतून दाम्पत्याच्या बेडरूममध्ये घुसण्याची शक्यता कमी आहे. सर्पमित्र, कोब्रा आणि डमीच्या मदतीने ही संपूर्ण घटना पुन्हा तयार करण्यात आली. ज्यामुळे या घटनेचा खुलासा झाला.

कोब्राला चिथावणी दिली तरी देखील...

माविश कुमार म्हणाले, "कोब्रा रात्रीच्या वेळी फारसे सक्रीय नसतात. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कोब्रा डमीवर टाकण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा तो जमिनीवर घसरून खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जात होता. आम्ही कोब्राला चिथावले तरी देखील त्याने चावण्याचा प्रयत्न केला नाही. "

दंश करण्यासाठी अखेर डमीच्या हातावर चिकनचा तुकडा ठेवला

त्यानंतर डॉक्टरांनी त्या डमीच्या हातावर चिकनचा तुकडा ठेवला आणि कोब्राची मान पकडून त्याला डिमीच्या जवळ नेले आणि त्या तुकड्यावर चावण्यास प्रवृत्त केले. ज्यानंतर सापाने त्या तुकड्याला दंश केला. यानंतर त्यांच्या लक्षात आले की, या दंशामधील अंतर हे तेवढेच होते जेवढे उत्तराच्या हातावर सापांच्या हल्ला केल्यावरती होते. ज्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती प्रकाश पडला.

सापाला चावायला लावलं...

त्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात आले की, उत्तराला जो साप पहिल्यांदा चावला होता, तो साप देखील सुरजनेच आणला होता. सखोल चौकशीनंतर सुरजने हे कबुल केलं की, त्याला उत्तराचे सगळे पैसे घेऊन दुसऱ्या एका स्त्री सोबत लग्न करायचे होते, ज्यासाठी त्याने हा सगळा सापळा रचला होता. परंतु या सगळ्यात तो स्वत:च अडकला.

कदाचित तो या सगळ्यात अडकला नसता जर त्या कोबऱ्यानं उत्तराला पहिल्याच वेळात दंश केला असता, कदाचित त्याने तिसऱ्यांदा उत्तराच्या जवळ हा साप जबरदस्ती नेला नसता तरी कदाचित तो यात अडकला नसता.

सूरजने उत्तराला मारण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली आणि आपल्या बुद्धीचा पुरेपुर वापर केला. परंतु ते म्हणतात ना वाईटावर नेहमी सत्याचाच विजय होतो. परंतु येथे विजय झाला तो उत्तराच्या आई-वडिलांचा पण बिचाऱ्या उत्तराचा मात्र यासगळ्यात बळी गेला.