नवी दिल्ली : सध्या दलित समाजात पसरलेल्या असंतोषानं मोदी सरकार चांगलंच हादरलंय. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं प्रतिमा सुधारण्यासाठी मोहीम हाती घेण्याचं ठरवलंय. या मोहिमेअंतर्गत सरकारनं केलेल्या विकास कामांची माहिती ग्रामीण आणि विशेषतः दलित जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत.
देशातल्या २० हजारांहून अधिक दलित बहुल गावात ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ११५ जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या १४ एप्रिलला म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त ग्राम स्वराज अभियान हाती घेतलं जाईल.
याअंतर्गत, उज्ज्वला योजना,जीवन ज्योती विमा योजना,सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य,जनधन योजना,सौभाग्य योजना आणि उजाला योजना या सात या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंचांचा सत्कार केला जाणार आहे.