COVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती

Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 4, 2024, 06:47 AM IST
COVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती title=

Corona New Variant JN.1: नव्या वर्षात कोरोनाने आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क सक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता पंजाबमध्येही सरकारने मास्क अनिवार्य केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील 11 राज्यांमध्ये जेएन 1 व्हेरिएंटच्या एकूण 511 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण 199 प्रकरणं समोर आली आहेत. 

कोणत्या राज्यात किती JN.1 चे रूग्ण?

कर्नाटक व्यतिरिक्त, केरळमध्ये 148, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, महाराष्ट्रात 32, तामिळनाडूमधून 26, देशाची राजधानी दिल्लीत 15, राजस्थानमध्ये 4, तेलंगणात 2, ओडिशात 1 आणि हरियाणामध्ये एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट खूप वेगाने पसरताना दिसतोय. गुरुग्राम, अजमेरसह अनेक शहरांमध्ये या व्हेरिएंटची पुष्टी करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात पाच नवीन कोविडच्या रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय कोरोनाच्या 602 नवीन प्रकरणांची नोंद केली गेली आहे. यावेळी एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,440 झाली आहे. केरळमध्ये दोन नवीन मृत्यूची नोंद झाली आहे, तर कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू नोंदवला गेला आहे. 

कोरोनाच्या परिस्थितीवर WHO ची नजर

कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचे वाढते रूग्ण पाहता जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने म्हटलंय की, यासंदर्भात समोर येणाऱ्या नवीन गोष्टींवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. आवश्यकतेनुसार JN.1 जोखीम मूल्यांकन करण्यात येतंय. 

महाराष्ट्रात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. संपूर्ण राज्यभरात कोरोनाची रुग्णांची संख्या 832 झाली आहे. यामध्ये नव्या जेएन-1 व्हेरियंटचे 32 रुग्ण आहेत. याशिवाय राज्यातील 9 जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या जेएन-1 व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या व्हेरियंटचे पुण्यात सर्वाधिक 17 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर ठाण्यात 5 जेएनचे रुग्ण आहे. बीड-3, छ.संभाजीनगर-2,कोल्हापूर-1,अकोला-1, सिंधुदुर्ग-1, नाशिक-1, सातारा-1, रुग्ण आढळल्याची माहिती आहे.