३ मे रोजी खरंच भारत लॉकडाऊन हटवण्याच्या स्थितीत आहे का?

3 मे ला दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपत आहे. पण काय आहे देशातील खरी स्थिती?

Updated: Apr 28, 2020, 05:26 PM IST
३ मे रोजी खरंच भारत लॉकडाऊन हटवण्याच्या स्थितीत आहे का? title=

नवी दिल्ली : भारताल लवकरच 40 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. पण त्यानंतर काय याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. देशातील दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3 मेला संपणार आहे. 27 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 28000 च्या वर पोहोचली असून 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढण्याची टक्केवारी खाली आली आहे. जे एक सकारात्मक संकेत आहेत. लॉकडाउनच्या आधी कोरोनाच्या दररोजच्या सरासरी वाढीचं प्रमाण 20 टक्के होतं जे आता 12 टक्क्यांवर आलं आहे.

चीनमधील कोरोनाचं केंद्र असलेल्या वुहानमध्ये 7 एप्रिल रोजी थोडी सूट देण्यात आली. ऑस्ट्रेलियात 14 एप्रिल, जर्मनीत 19 एप्रिल आणि स्वित्झर्लँडमध्ये 27 एप्रिलला लॉकडाउन हटवण्यात आले किंवा थोडी सूट देण्यात आली. इटली आणि ऑस्ट्रेलिया या आठवड्यात लॉकडाऊन हटवण्याचा विचार करत आहेत.

भारता शिवाय अनेक देशांमध्ये रोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जर्मनीने 19 एप्रिलला लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर येथे 2475 नवीन रुग्ण आढळले. इटली ४ मेला लॉकडाऊन हटवणार आहे. पण येथे देखील एका आठवड्यात 2671 नवे रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये हा आकडा 3993 आहे. 9 मेला स्पेन लॉकडाऊन हटवणार आहे.

जेव्हा आपण जगाची तुलना करु तेव्हा भारत चांगल्या परिस्थितीत दिसत आहे. लॉकडाउन, कर्फ्यू आणि टेस्टिंगमुळे पश्चिमेकडील अनेक देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. 

महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. केरळ आणि कर्नाटकची स्थिती मध्यम आहे. सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये जिल्हे वाटले आहेत. त्यानंतर तेथे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले. मुख्यमंत्र्यांना त्यांनी लॉकडाउन एक्झिट पॉलिसी तयार करण्यास ही सांगितले आहे.

नीती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी एक अहवाल सादर केला होता ज्यामध्ये त्यांनी भारतात प्रत्येक दिवशी नवीन रुग्ण वाढण्याचं प्रमाण मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिसेल असं म्हटलं आहे. १६ मे पर्यंत रुग्ण वाढण्याची संख्या शुन्यावर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.