China howitzer gun deployed on LoC: भारताविरोधातील भूमिका घेणारे चीन आणि पाकिस्तान (China - Pakistan) हे दोन्ही देश आता पुन्हा एकदा देशाविरोधात नवी चाल चालताना दिसत असून, त्यांनी लष्करी कारवायांना वेग दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीननं जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देताना दिसत आहे.
चीनकडून LOC वर स्टीलहेड बंकर तयार केले जात असून, ड्रोनची क्षमताही वाढवली असून, लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती मिळाल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं प्रसिद्ध केलं आहे. नियंत्रण रेषेनदीक भारतविरोधी कारवायांसाठी चीनकडून पाकिस्तानला पुरवण्यात येणारी मदत वाढवण्यात आली असून, सध्याच्या घडीला या भागात एन्क्रिप्टेड संचार टॉवरपासून भूमिगत फायबर केबलचं जाळं टाकण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही राष्ट्र एकत्र येत भारताविरोधातील कुरापतीं करत असून, कमी आणि मध्यम उंचीवर असणाऱ्या शत्रूचा लक्ष्यभेद करण्यासाठी 'JY' आणि 'HGR' या चिनी रडार यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे. ज्या माध्मयातून पाकिस्तानी लष्कराला गोपनीयरित्या मदत मिळत राहणार आहे.
लष्कराशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही शत्रू राष्ट्र एकत्र येत नियंत्रण रेषेपाशी तणावाच्या परिस्थिती आणखी भर टाकताना दिसत आहेत. याच कटकारस्थानांचा भाग म्हणून एलओसीवर चीनची 155 मिमी ट्रक माऊंटेड एसएच 15 हॉविट्झर गन विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानसोबतचं नातं आणखी घट्ट करत शेजारी राष्ट्रासोबत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी चीननं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
एकिकडे चीनची शस्त्र समीरेषेनजीक तैनात असतानच दुसरीकडे सीमेनजीक असणाऱ्या लष्करी तळांवर चिनी लष्करातील कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती दिसली नसल्याचंही सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही काही गुप्तहेरांच्या माहितीनुसार चिनधील काही अभियंते आणि लष्करातील जवान भूमिगत बंकर तयार करण्याच्या कामाला वेग गेत असून, लीपा खोऱ्यात या बांधकामाचे नमुने आढळले होते. दरम्यान सीमेपलिकडे सुरु असणाऱ्या या सर्व कारवायांमुळं भारतीय लष्कराच्या चिंतेत भर टाकली असून, संभाव्य धोका लक्षात घेता लष्कराकडूनही या भागावर करडी नजर ठेवली जात आहे.
हॉविट्झर गनविषयी सांगावं तर, कॅनन या प्रकारात मोडणाऱ्या तोफेच्या तुलनेत या तोफेचे बॅरल तोकडं आणि कमी लांबीचं असतं. तोफेतून बाहेर पडणारा दारुगोळा लंबवर्तुळाकारात फिरत मारा करतो. ज्यामुळं ही तोफ एखादी तटबंदी भेदण्यात फायद्याची ठरते. कारगिलच्या युद्धात भारतीय लष्करानं पर्वतीय क्षेत्रामध्ये हॉविट्झर प्रकारातील बोफोर्स तोफांचा वापर केल्याचं पाहायला मिळालं होतं.