उच्चायुक्तांसोबतची गैरवर्तणूक थांबवा, भारताची पाकिस्तानला ताकिद

अधिकाऱ्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले होते

Updated: May 5, 2019, 11:31 AM IST
उच्चायुक्तांसोबतची गैरवर्तणूक थांबवा, भारताची पाकिस्तानला ताकिद  title=

इस्लामाबाद :भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानकडे उच्चायुक्तांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी तक्रार करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारतीय दुतावासातील दोन उच्चायुक्तांचा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून वारंवार पाठलाग करण्यात येत असून त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वागणूकीविषयीची बाब शनिवारी उघड करण्यात आली. मागील महिन्यात पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावासांना एका खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार घडल्याची खळबळजनक माहिती मिळाली. 

पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील काहीजणांनी दोन भारतीय अधिकाऱ्यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारत त्यांना एका खोलीमध्ये बंद करुन ठेवण्यात आल्याचं पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे. जवळपास अर्ध्या सातासाठी त्यांना या खोलीत बंद करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या सामानाची तपासणी करत त्या अधिकाऱ्यांना काही प्रश्नही विचारण्यात आल्याची बाब समोर येत आहे. 

सूत्रांचा हवाला देत 'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्या ठिकाणहून सुटका होत अतसाना संबंधित भागात न परतण्याची ताकिदही त्या भारतीय अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तानला देण्यात आलेल्या माहितीमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये पाकिस्तानने तातडीने तपासणी सुरु करत कारवाई करावी तसंच येत्या काळात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेण्याची थेट विचारणाही करण्यात आली आहे. 

भारताच्या उच्चायुक्तांसोबत पहिल्यांदाच ही घटना घडली आहे असं नाही. यापूर्वीही इस्लामाबाद येथे अशा घटना घडल्याचं पाहायला मिळालं होतं. जेथे भारतीय अधिकाऱ्यांचा पाठलाग करणं, त्यांच्यावर पाळत ठेवणं यांसारख्या घटना घडल्याची माहिती समोर आली होती.